सामान्यपणे असं फार कमी वेळा होतं की, रेल्वेत तुमची एखादी वस्तू हरवली तर ती परत मिळेल. पण लंडनमध्ये याउलट एक घटना घडली आहे. इथे स्टीफन मॉरिस नावाच्या एका संगीतकाराची ३१० वर्ष जुनी अनोखी व्हायोलिन रेल्वेत हरवली. मात्र, पुढील १० दिवसात त्यांना ती परत मिळाली.
ही व्हायोलिन १७०९ मध्ये डेव्हिड टेक्लर नावाच्या व्यक्तीने तयार केली होती. या व्हायोलिनची किंमत साधारण २.२८ कोटी रूपये सांगितली जात आहे. २२ ऑक्टोबरला स्टीफन मॉरिस दक्षिण लंडनमध्ये रेल्वेने प्रवास करत होते. तेव्हाच त्यांची व्हायोलिन हरवली. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली.
ब्रिटीश ट्रान्सपोर्ट पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज जारी केलं आणि ज्या व्यक्तीला ही व्हायोलिन सापडली, त्या व्यक्तीची ओळख पटवली गेल्याचं सांगण्यात आलं. पुढील २४ तासाच्या आतच त्या व्यक्तीने ट्विटरवर मॉरिससोबत संपर्क केला आणि सांगितलं की, व्हायोलिन परत करायची आहे. त्यांनी भेटायचं ठरवलं. शुक्रवारी दोघे भेटले आणि डेव्हिडना व्हायोलिन परत मिळाली.
मॉरिस यांनी सांगितले की, त्या व्यक्तीने आधी माफी मागितली आणि नंतर व्हायोलिन परत केली. यावेळी पोलीस मॉरिससोबत होते. पोलिसांनी सांगितले की, आरोपीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. कारण त्याने स्वत: मॉरिससोबत संपर्क केला आणि व्हायोलिन परत केली.