Dog Attack: गेल्या काही काळापासून कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. भटक्या कुत्र्यांचा त्रास अनेक ठिकाणी आहे. त्यांच्यामुळे लोकांना रस्त्यावर विशेषतः रात्रीच्या वेळी बाहेर पडणेही कठीण झाले आहे. अंधारात कुत्र्यांचा जमाव अनेकदा महिला किंवा लहान मुलांवर हल्ले करतो. एखादे लहान मुलं चुकूनही त्यांच्या तावडीत सापडले, तर हे कुत्रे ओरबाडून काढतात किंवा ठारही करतात. या कुत्र्यांच्या हल्ल्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
रात्रीची वेळ दोन लहान मुलं रस्त्याने जात होती, यावेळी अचानक कुत्र्यांच्या टोळीने त्यांच्यातल्या एकावर हल्ला केला. त्या लहान मुलाला कुत्र्यांनी ओरबाडून काढले. सुदैवाने काही महिला धावत आल्या आणि त्या मुलाचा जीव वाचला. थोडा उशीर झाला असता, तर त्या मुलासोबत मोठी घटना घडली असती. दरम्यान, ही घटना कुठलही आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि मुलगी रस्त्याने जात आहेत, यावेळी अचानक कुत्र्यांची टोळी त्यांच्यावर हल्ला करते. यावेळी मुलगी पळून जाते, पण मुलगा कुत्र्यांच्या तावडीत सापडतो. कुत्रे मुलावर हल्ला करत असतात, तेवढ्यात महिला तिथे धावत येते आणि मुलाला वाचवते. हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gharkekalesh नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला असून, 'तुमच्या मुलांना भटक्या कुत्र्यांपासून दूर ठेवा' असे कॅप्शन व्हिडिओला दिले आहे.
अवघ्या 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर हजारो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'भारतातील भटके कुत्रे खूप धोकादायक होत चालले आहेत.' दुसऱ्या लिहिले की, 'हे खूप भयंकर आहे. पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, त्यांना रस्त्यावर एकटे सोडू नये.'