कॅन्सरसारख्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच हा आजार पूर्णपणे बरा होइलच असे नाही. अशातच जर या आजाराने लहान मुलांना आपल्या जाळ्यात खेचलं तर मात्र या चिमुरड्यांना फार गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. लहान वयात होणाऱ्या कॅन्सरमुळे संपूर्ण कुटुंबावर वाईट पद्धतीने प्रभाव पडतो.
सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा फोटो पाहून सगळे नेटकरी भावूक झाले आहेत. एक बहिण आपल्या कॅन्सरग्रस्त भावाला धीर देत असतानाचा हा फोटो आहे. या भावंडांचा फोटो त्यांची आई कॅटलिन यांनी शेअर करत त्यासंबंधी पोस्ट लिहिली आहे. कॅटलिन अमेरिकेतील टेक्सास शहरातील रहिवाशी आहेत.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये पाच वर्षांची ऑब्रे आपल्या चार वर्षांच्या कॅन्सरग्रस्त भावाला धीर देताना दिसत आहे. घरातील सर्वात लहान आणि लाडक्या बेकेटला एवढ्या लहान वयात कॅन्सर झाल्यामुळे त्याच्या कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. कॅन्सरवर उपाय म्हणून देण्यात येणाऱ्या किमोथेरपीमुळे बेकेटला असह्य वेदना सहज कराव्या लागत आहेत. या आजारामुळे त्याचं बालपण हरवलं आहे.
फॉक्स न्यूजने यासंबंधात वृत्त दिले आहे. बेकेटला 2018मध्ये एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्यूकेमिया झाल्याचं निदान झालं. या कॅन्सरचा थेट परिणाम पांढऱ्या पेशींवर होतो. बेकेटला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एक महिना रुग्णालयात घालवल्यानंतर बेकेट घरी परतला. त्यासंदर्भात कॅटलिन यांनी फेसबुकवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.
कॅटलिन यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'माझी मुलं शाळेत, घरात खेळण्यापासून ते आता घरात पूर्णपणे बंदिस्त झाली आहेत. अशातच ऑब्रेने आपल्या लहान भावाला खोडकर आणि खेळकर मुलापासून आजारी आणि शातं होताना पाहिलं आहे.
अवघी पाच वर्षांची ऑब्रे मोठ्या बहिणीची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. त्याची काळजी घेण्यापासून ते घरात स्वच्छता राखण्यापर्यंत ती सर्व कामं करते.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो पाच हजाराहून जास्त कमेंट आल्या असून 34 हजाराहून जास्त शेअर आहेत.