दक्षिण-पूर्व चीनमध्ये एक २३ वर्ष जुना ५१७३ फूट लांब पूल पाडण्यात आला आहे. प्रशासनाने विस्फोटकाच्या माध्यमातून पूल पाडण्याचा निर्णय घेतला होता. हा पूल शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यात अपयशी ठरत होता. केवळ ३.५ सेकंदात हा पूल पाडण्यात आल्याचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
गेल्या शुक्रवारी चीनच्या जियांग्लशी प्रांतात गण नदीवर असलेल्या या पुलाचं बांधकाम १९९५ मध्ये पूर्ण झालं होतं. हा पूल उभारण्यात २ वर्षांचा कालावधी लागला होता आणि हा पूल पाडण्याला केवळ काही सेकंद लागले. शहरातील हजारो लोक हे पाहण्यासाठी आले होते.
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, वाढती लोकसंख्या पाहता हा पूल गरजा पूर्ण करत नव्हता. २३ वर्ष जुन्या या पुलाची अनेकदा डागडुजीही केली गेली होती. आता या जागेवर एका नव्या पुलाची उभारणी होणार आहे. आता या नदीवर ७,२५३ फूट लांब पूल बांधला जाणार आहे.