धकाधकीच्या जीवनात फिट राहणं ही काळाची गरजच बनली आहे. यासाठी अनेक जण जिममध्येही जातात. वयाच्या पन्नाशीनंतर आपल्याला फिट अँड फाईन ठेवणं हे आव्हानही असतं. परंतु असे अनेक लोक आहेत जे या वयानंतरही तरुणांना तोडीस तोड देतात. सोशल मीडियावर अशाच एका महिलेची कहाणी व्हायरल होत आहे, ज्यामुळे नक्कीच अनेकांना प्रेरणा मिळेल. या ५६ वर्षीय महिला आपल्या सूनेसोबत साडी परिधान करून जिममध्ये वर्कआऊटला जातात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ह्युमन्स ऑफ मद्रास (humansofmadraoffl) या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘वय ५६ वर्षे आहे… तर काय झालं? त्या साडी परिधान करतात आणि पॉवलिफ्टिंग व पुशअप्सही करतात. वय ही केवळ एक संख्या आहे. त्या आपल्या सूनेसोबत रोज वर्कआऊट करतात. याला एकमेकांसोबत पुढे जाणं असं म्हटलं जात नाही का? दोघांचंही वर्कआऊट करणं प्रेरित करणारं आहे,’ असं कॅप्शन याला देण्यात आलंय.
गुडघेदुखींची होती समस्याजेव्हा आपल्याला गुडघेदुखी आणि पायांचं दुखणं असल्याचं समजलं तेव्हा आपण ५२ व्या वर्षी पहिल्यांदा जिममध्ये गेल्याचं सासूबाई म्हणाल्या. त्यांच्या मुलानं अनेक ठिकाणी उपचारासाठी नेलं. सर्वांनी त्यांना वर्कआऊट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी जिममध्ये जाण्यास सुरूवात केली. त्या आपल्या सूनेसोबत रोज जिममध्ये पुशअप्स आणि पॉवरलिफ्टिंगच नाही तर अन्य वर्कआऊटही करतात. यामुळे त्यांचं पायाचं दुखणंही आता कमी झालं आहे.
त्यांचा वर्कआऊटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसंच त्या व्हिडीओला अनेकांची पसंतीही मिळाली आहे.