Gas stove Cleaning Tips : घराघरांमध्ये सकाळी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत गॅस शेगडीचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी केला जातो. अशात अनेक त्यावर तेल, मसाले, भाजी अशा गोष्टी सांडत असतात. या गोष्टी वेळीच साफ केल्या नाही तर त्यावर चिकटून बसतात. नंतर जेव्हा तुम्ही या गोष्टी साफ करायला जाता तेव्हा त्या लगेच निघत नाही. शेगडीवर एक चिकटपणा येतो. शेगडीचे बटनही चिकट होतात आणि त्यावर आणखी धूळ माती बसते. हे स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गॅस शेगडीवरील चिकट तेलाचे, मसाल्यांचे डाग साफ करण्यासाठी काही स्वस्तात मस्त घरगुती उपाय सांगणार आहोत.
कमी खर्चातील उपाय
१) व्हाईट व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगरचा वापर वेगवेगळ्या पदार्थांसोबत सफाई करण्याच्या कामातही केला जातो. गॅस शेगडी चमकवण्यासाठी तुम्ही थोड्या पाण्यात व्हाईट व्हिनेगर टाका आणि हे मिश्रण शेगडीवर स्प्रे करा. काही वेळ ते तसंच राहू द्या. काही वेळानंतर एका स्पंजच्या मदतीने शेगडी घासा. शेगडीवरील चिकटपणा डाग दूर झालेले दिसतील.
२) बेकिंग सोडा
वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा बेकिंग सोडा वस्तूंवरील चिकटपणा आणि डाग दूर करण्याच्याही कामी येतो. थोडा बेकिंग सोडा शेगडीवर सगळीकडे टाका. काही वेळ तो तसाच राहू द्या. नंतर एका कापडाने शेगडी स्वच्छ करा. तेलाचे दाग दूर झालेले दिसतील.
३) गरम पाणी
गरम पाणी चिकटपणा आणि काळे डाग दूर करण्यासाठी खूप आधीपासून वापरलं जातं. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा. हे गरम पाणी शेगडी टाकून ठेवा. नंतर एका घासणीने शेगडी घासा. डाग गायब होतील. यात थोडा लिंबाचा रसही टाकू शकता.
४) व्हिनेगर आणि बेकिंग सोडा
गॅसच्या शेगडीवरील तेल, मसाले आणि पदार्थांचे डाग दूर करण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रणही वापरू शकता. यासाठी २ ते ३ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यात व्हिनेगर टाका. याचं चांगलं मिश्रण तयार करा. ही पेस्ट तयार झाल्यावर शेगडीवर सगळीकडे लावा आणि २० मिनिटे तशीच राहू द्या. आता एका स्क्रबरच्या मदतीने चांगलं घासा आणि नंतर ओल्या कापडाच्या मदतीने शेगडी पुसून घ्या. या मिश्रणात तुम्ही थोडा लिंबाचा रसही टाकू शकता.
५) कांदा
गॅस शेगडी आणि बर्नर साफ करण्यासाठी तुम्ही कांद्याचाही वापर करू शकता. यासाठी काही कांदे २० मिनिटे पाण्यात उकडून घ्या. हे पाणी थंड होऊ द्या. पाणी आणि उकडलेल्या कांद्याने शेगडी चांगली घासा. काही मिनिटांमध्ये शेगडी चमकदार होईल.
६) लिंबू आणि व्हिनेगर
चिकटपणा आणि डाग घालवण्यासाठी सगळ्यात जास्त लिंबाचा वापर केला जातो. यासाठी तुम्ही लिंबाचा रस आणि सालीचा वापर करू शकता. लिंबाच्या सालीवर बेकिंग सोडा किंवा अॅपल व्हिनेगरचे काही थेंब टाका. याने शेगडी घासून काढा. डाग आणि चिकटपणा लगेच दूर होईल.