(Image Credit : krmg.com)
ख्रिसमसचा उत्सव आता काही दिवसांवरच आला आहे. ख्रिसमस म्हटला की, सॅंटा क्लॉज आणि आवडते गिफ्ट. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच सॅंटा क्लॉजकडे इच्छा व्यक्त करतात. अशीच एका अनोखी इच्छा एका ७ वर्षीय मुलाने केली आहे. त्याने एक चिठ्ठी लिहून सॅंटाकडे अनोखी इच्छा व्यक्तीये. ही चिठ्ठी वाचून सोशल मीडियातील लोक भावूकही झालेत आणि अनेकांना मुलाची निरागसताही भावली आहे.
ब्लेक नावाच्या हा मुलगा त्याच्या आईसोबत शेल्टर होममध्ये राहतो. हे शेल्टर टेक्सासमध्ये आहे. यात अशा लोकांना जागा दिली जाते जे कौंटुंबिक हिसांचाराचे शिकार आहेत. काही दिवसांपूर्वी ब्लेकच्या आईला ही चिठ्ठी त्याच्या बॅगमध्ये सापडली. आता ही चिठ्ठी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे.
फेसबुकवर एका सामाजिक संस्थेने ही चिठ्ठी शेअर केली. त्यात त्याने सॅंटा क्लॉजकडे इच्छा व्यक्ती केली की, त्याला 'चांगला पिता भेट म्हणून मिळावा'. त्याने लिहिले की, 'प्रिय सॅंटा, आम्हाला आमचं घर सोडावं लागलं. वडील फार रागात होते. त्यांना ते सगळं मिळालं, जे त्यांना हवं होतं. आई म्हणाली की, आता घर सोडावं लागेल. ती आम्हाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जात आहे. मी अजूनही चिंतेत आहे. मला दुसऱ्या मुलांबाबत काही बोलायचं नाहीये. काय तुम्ही या ख्रिसमसला येणार आहात?'.
त्याने चिठ्ठीत पुढे लिहिले की, 'इथे आमच्याकडे काहीच नाही. तुम्ही माझ्यासाठी काही पुस्तके, एक डिक्शनरी, एका कम्पास आणि एक घड्याळ आणू शकता? मला एका फार फार चांगल्या वडिलांची गरज आहे. तुम्ही मला ते देऊ शकता का?'.
लहान वयात मुलांच्या मनावर परिवारातील वादांचे कसे परिणाम होतात, याचंच हे उदाहरण आहे. आशा करू या कि, ब्लेकला त्याला हव्या असलेल्या गोष्टी संस्थेकडून मिळतील आणि सॅंटा त्याची वडिलांची इच्छाही पूर्ण करेल.