नबरंगपूर - ज्या डिजिटल दुनियेत काही सेकंदात कोट्यवधीचा पैशाचा व्यवहार होतो त्याच युगात एक वृद्ध महिला खुर्चीच्या सहाय्याने अनवाणी भर उन्हात अनेक किमी पायपीट करत आहे. ओडिशाच्या नबरंगपूर येथील हा व्हिडिओ समोर आला. एक ७० वर्षीय महिलेला तिची पेन्शन घेण्यासाठी तुटलेल्या खुर्चीचा आधार घेत तळपत्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरून अनवाणी पायपीट करावी लागली.
व्हिडिओत दिसणाऱ्या या महिलेचे नाव सूर्या हरिजन आहे. जी ओडिशाच्या नबरंगपूर येथे राहते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बँक अधिकारी खडबडून जागे झाले. या समस्येवर तात्काळ तोडगा काढला जाईल. जेणेकरून पुन्हा सूर्या हरिजन यांच्यासारख्या महिलांना असा त्रास होणार नाही असं अधिकारी म्हणाले. ओडिशात सध्या तापमान ३० डिग्रीच्या वर आहे. राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. अशा तापत्या वातावरणात महिलेला तिच्या हक्काची पेन्शन मिळावी यासाठी पायपीट करावी लागतेय हे डिजिटल भारताचे भयानक वास्तव आहे.
वयासोबत सूर्या हरिजन यांच्या शरीराची ताकद चालण्यासाठी कमी पडतेय म्हणून त्यांनी खुर्चीचा आधार घेतला. सूर्या हरिजन या नबरंगपूरच्या झरिगान प्रखंड तालुक्यातील बनुआगुडा गावच्या रहिवाशी आहेत. काही माध्यमांनुसार, सूर्याचा मुलगा प्रवासी मजूर असल्याने तो दुसऱ्या राज्यात मजुरी करण्यासाठी गेला आहे. ही वृद्ध महिला तिच्या छोट्या मुलाच्या कुटुंबासह इथं राहते. हे कुटुंबही दुसऱ्यांच्या घरी काम करून पोट भरते. कुटुंबाकडे जमीन नाही. राहायला साधी झोपडी आहे.
भारत सरकारच्या नियमानुसार, पूर्वी रोकड पेन्शन दिली जायची. परंतु आता व्यवस्था बदलली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात ऑनलाईन पैसे दिले जातात. मात्र कधी कधी अशी स्थिती येते जिथे पेन्शनधारकांच्या अंगठ्याचे निशाण जुळत नाही तेव्हा पेन्शन राशी देण्यास विलंब होतो. याच परिस्थिती सूर्या हरिजनची पेन्शन मागील ४ महिन्यांपासून रखडली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता यापुढे सूर्या यांना बँकेत येण्याची गरज भासणार नाही. लवकरच बँक या समस्येवर तोडगा काढेल असं बँक मॅनेजर म्हणाले.