पाकिस्तानात सध्या हैराण करणारा प्रकार समोर आला आहे. ज्यात एक १३ वर्षीय मुलगा आणि १२ वर्षीय मुलीचं लग्न होत आहे. हे दोघेही अल्पवयीन असून यांच्या साखरपुड्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. बहुतांश लोकांनी या लग्नावर आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली आहे.
इन्स्टाग्रामवर सलाम पाकिस्तान नावाच्या हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात दोन अल्पवयीन मुलगा-मुलगी पाहायला मिळतात. मुलाने डोक्यावर पगडी घातलीय तर मुलगी नव्या नवरीसारखी सजली आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, १३ वर्षीय या मुलांचे लग्न होणार आहे. लग्नासाठी १३ वर्ष योग्य आहे का? आपल्याला या प्रकाराबाबत काय वाटतं असा प्रश्न करण्यात आला आहे.
रिपोर्टनुसार, या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलाने त्याच्या कुटुंबाला अल्टिमेटम दिला होता. ज्यात मी माझे शिक्षण तेव्हाच पूर्ण करेन जेव्हा माझे लग्न लावले जाईल. मुला-मुलीच्या या हट्टापायी दोन्ही कुटुंबाने लग्नासाठी होकार दिला आणि त्यातून मोठ्या धूमधडाक्यात दोघांचा साखरपुडा पार पडला. विशेष म्हणजे, या दोन्ही मुलांच्या आईने हे लग्न योग्य असल्याचे म्हटलं. मुलीच्या आईचे लग्नही वयाच्या १६ व्या वर्षी झाले. तिने अनुभवावरून कमी वयात मुलीचे लग्न करणे योग्य असल्याचे सांगितले.
तर मुलाच्या आईचं लग्न २५ व्या वर्षी झाले असून तिने मुलाच्या लग्नाला परवानगी देत ते योग्य असल्याचं म्हटलं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल असून लग्नावरून पाकिस्तान आणि मुलाच्या कुटुंबावर बरीच टीका होत आहे. हा देश खरोखरच बर्बाद झाला आहे. कमीत कमी शिक्षण पूर्ण करा असं एका युझरने कमेंट केली. त्याचसोबत काहींनी या प्रकारावरून आई वडिलांना दोष देत त्यांच्यावर खटला चालवला जावा अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी कायद्यानुसार मुलाचे लग्नाचे वय किमान १८ तर मुलीचे वय १६ असावे लागते. सिंध प्रांतात २०१३ मध्ये मुला-मुलींच्या लग्नाचे वय किमान १८ वर्ष करण्यात आले. परंतु हा बदल देशभरात लागू करण्यात आला नाही. जागतिक पातळीवर मुला-मुलीचे लग्नाचे वय किमान १८ वर्ष असावे लागते. परंतु या प्रकारामुळे कायदा असूनही सातत्याने होणाऱ्या बालविवाहाच्या घटना घडतायेत हे दिसून येते.