मधुबनी : आजच्या एकविसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात ऑनलाइन व्यवहार सुरू आहेत. अनेक भागात तर ऑनलाइन व्यवहाराशिवाय कोणतेच काम होत नाही. सर्व गरजू वस्तू ऑनलाइन खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत, यामध्ये नवरदेव विक्रीचा ऑनलाइन बाजार भरवला तर आश्चर्य होण्यासारखे काही नाही, कारण ही सत्य घटना आहे. अनेक ठिकाणी ऑनलाइन लग्न जमवली जातात यासाठी मराठी शादी डॉट कॉम आणि जीवनसाथी सारख्या सुविधा आजच्या धावपळीच्या जगात बाजारात आल्या आहेत.
अनोख्या बाजाराची रंगली चर्चा
दरम्यान, बिहारमधील मधुबनी येथे चक्क नवरदेवांचा बाजार भरवला जात असून वधू बनण्यासाठी तयार असलेल्या मुलींसाठी वरांचे चांगले पर्याय ठेवण्यात आले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे हा नवरदेवांचा बाजार एका पिंपळाच्या झाडाखाली भरला आहे, मात्र आपल्याला वाटेल तेव्हा नवरदेवाला घेऊन येता येणार नाही त्यासाठी काही अटी देखील आहेत.
हा बाजार केवळ ९ दिवस भरतो आणि ही प्रथा आजची नसून ही तब्बल ७०० वर्षांची जुनी परंपरा आहे. अर्थात हा बाजार बिहारच्या या भागात शतकानुशतके वर्षांपासून सुरू आहे. तेथील स्थानिक लोक या अनोख्या बाजाराला 'सौरभ सभा' असे म्हणतात. या सभेसाठी विविध जिल्ह्यातील ब्राम्हण समाजाचे लोक सहभागी होतात. खरं तर लोक त्यांच्या मुलीसाठी योग्य वराचे स्थळ शोधण्यासाठी इथे येत असतात. तर नवदेव आपल्या कुटुंबासह इथे हजेरी लावतात. प्रत्येक नवरदेवाची किंमत त्याच्या पार्श्वभूमीवर आणि शिक्षणानुसार ठरवली जाते. लग्न ठरण्याच्या आधी नवरदेवाची सर्व माहिती मागवली जाते आणि त्यात तो योग्य असेल तर या सभेत स्थान दिले जाते.