नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही प्रतिभा असतात. काही लोक त्यांच्या अनोख्या छंदांच्या जोरावर तर काही लोक अनोखी किमया साधून नाव कमावतात. मात्र ही प्रतिभा केवळ मानवामध्येच नसून पक्षांमध्ये देखील असते. याचा प्रत्यय एका अनोख्या पक्ष्याने दिला आहे. मजबूत पंख असलेल्या अशाच एका प्रतिभावान पक्ष्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Longest Flight World Record) स्थान मिळवले आहे. फक्त 5 महिन्यांच्या एका पक्ष्याने अलास्का ते ऑस्ट्रेलियाच्या टास्मानियापर्यंत हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे हा पक्षी तब्बल 11 दिवस न थांबता उडत राहिला.
264 तास न थांबता रात्रंदिवस घेतली 'भरारी'बार टेल्ड गॉडविट नावाच्या या पक्ष्याने 13 ऑक्टोबर रोजी अलास्कापासून ऑस्ट्रेलियातील तस्मानियासाठी घेतलेली भरारी 25 ऑक्टोबर रोजी पूर्ण केली. त्याने तब्बल 11 दिवस सतत प्रवास करत 13 हजार 560 किलोमीटरचे अंतर कापले. पक्ष्याच्या खालच्या बाजूला सॅटेलाइट टॅग लावण्यात आला होता, ज्याद्वारे त्याचा माग काढला जात होता. या पक्ष्याने न थांबता भरारी घेत ओशनिया, वानुआतु आणि न्यू कॅलेडोनिया ही बेटे पार करत टास्मानियाचे टोक गाठले. 5G टॅगद्वारे त्याच्या प्रवासाचे अंतर मोजण्यात आले, ज्यानंतर याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
दूरच्या प्रवासासाठी माहिर 'गॉडविट'बार टेल्ड गॉडविट प्रजातीचा पक्षी दूरच्या प्रवासासाठी खूप प्रसिद्ध आहे. खरं तर 2020 मध्ये देखील 11 दिवसांत या प्रजातीच्या पक्ष्याने 12 हजार किलोमीटरचा न थांबता प्रवास केला होता. हा पक्षी अलास्का येथून उडत न्यूझीलंडला पोहोचला होता. 2021 मध्येही हा पक्षी 13 हजार 50 किलोमीटरपर्यंत सतत उडत राहिला आणि नंतर खाली उतरला. दरम्यान, हे पक्षी भरारी घेताना काहीही खात नाहीत किंवा पीत नाहीत. त्यांचे वजन 250 ते 450 ग्रॅम पर्यंत असते आणि पंखांची रुंदी 70 ते 80 सेमी असते. विशेष बाब म्हणजे त्यांची प्रजाती फक्त अलास्कामध्ये आढळते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"