नवी दिल्ली : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अद्भुत सोहळा आहे, कारण यादिवसापासून नवदाम्पत्याच्या एका नवीन जीवनाची सुरूवात होत असते. लग्नासाठी पाहुणे मंडळीपासून ते निकटवर्तीय सर्वच जण हजेरी लावतात. अशावेळी कोणाच्याही खाण्या-पिण्याबाबत हलगर्जीपणा केला जात नाही. मात्र, परदेशातील एका मॉडेलचं लग्न या सर्वाला अपवाद ठरलं आहे. कारण मॉडेलनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, लग्न शानदार पद्धतीनं करणार आहे, परंतु उपस्थित पाहुण्यांना स्वतःच्या जेवणाचं बिल द्यावं लागणार आहे.
ब्रिटेनमधील या मॉडेलनं आपल्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना पैशांचे नियोजन करून येण्यास सांगितलं आहे. म्हणजेच तुम्ही लग्नाला जरूर या, पण सोबत जेवणाचा खर्च देखील देऊन जा. मॉडेलचं हे अनोखं फर्मान खूप चर्चेचा विषय बनलं आहे. एवढंच नाही तर तिनं आपलं लग्न कमी खर्चात करण्याची योजना आखली आहे.
मिरर'नं दिलेल्या वृत्तानुसार, ४० वर्षीय मॉडेल कार्ला बलुची आलिशान पद्धतीनं लग्न करणार आहे. विशेष बाब म्हणजे ४ मुलांची आई असलेली कार्ला ही ५२ वर्षीय मंगेतर जोवानीसोबत लग्नगाठ बांधणार असून या लग्नात एकूण ३८ लाख रूपये खर्च होणार आहेत. कार्लाचं लग्न इतर लग्नांपेक्षा खूप वेगळं असल्यामुळं चर्चेचा विषय बनला आहे. कारण, या लग्नासाठी जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला ९ हजार रूपये द्यावे लागणार आहेत. एवढंच नाही तर हॉटेलचा खर्चही सुमारे दोन लाख रुपये असणार आहे.
मोफत जेवण देणं पडेल महागातब्रिटेनच्या हर्टफोर्डशायर येथे राहणारी कार्लाची आर्थिक बाजू मजबूत आहे. तरी देखील तिला आपले पैसे खर्च करायचे नाहीत असे ती म्हणते. विशेष म्हणजे आपल्या अनोख्या लग्नासाठी तिनं केवळ ३० पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. लग्नासाठी पांढरे घोडे, फाइव्ह स्टार हॉटेल्स आणि कपड्यांवर बराच खर्च करण्यात आला आहे. एन्गेजमेंट रिंगची किंमत देखील ६ लाख रुपये आहे. त्यामुळे कार्लाला लग्नात उपस्थित राहणाऱ्या मंडळींकडून पैसे आकारून या सर्वाची भरपाई करायची आहे.