आयपीएल २०२३ च्या अंतिम फेरीत गतविजेत्या गुजरात टायटन्सला पराभूत करून चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा किताब पटकावला. रवींद्र जडेजाने नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयी चौकार लगावून आयपीएलला सोळावा चॅम्पियन दिला. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एवढ्या उशिरापर्यंत सामना खेळवला गेला. चेन्नईच्या विजयानंतर चाहत्यांसह संघातील खेळाडूंनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी होणारा सामना सोमवारी घेण्यात आला. पहिला डाव झाल्यानंतर सोमवारी देखील पावसाने बॅटिंग करण्यास सुरूवात केली आणि खेळाडूंना बाकावर बसावे लागले. पहिला डाव संपल्यानंतर पाऊस आल्याने सामना मध्यरात्रीपर्यंत चालला. सोमवारी अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. विजयानंतर सेलिब्रेशन करतानाचा धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, धोनी ट्रॉफीच्या शेजारी उभा राहिला आहे, तर त्याची पत्नी साक्षी अन् मुलगी झिवा त्याच्या समोरील बाजूला आहेत. साक्षी धोनीला आपल्याकडे येण्याचा इशारा करते. पत्नीनं केलेल्या सततच्या इशाऱ्यांनंतर धोनी साक्षी आणि झिवाकडे जाऊन त्यांना मिठी मारतो.
उत्कर्षाच्या प्रेमात ऋतुराज 'क्लिन बोल्ड', वधू-वराच्या हातावरील मेहंदीत लपलंय काय? पाहा फोटो
चेन्नई पाचव्यांदा चॅम्पियन गुजरात टायटन्सला फायनलच्या सामन्यात अखेरच्या चेंडूवर पराभूत करून धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले. मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.