नवी दिल्ली ।
सध्या एक पिज्जा डिलिव्हरी बॉय त्याच्या कामगिरीमुळे जगभर चर्चेत आहे. कारण या पिज्जा डिलिव्हरी बॉयने स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीचा सामना करत घरात अडकलेल्या ५ लहानग्यांचा जीव वाचवला आहे. खरा हिरो कसा असावा याचा प्रत्यय देणारी ही घटना खूप चर्चेचा विषय बनली आहे. निकोलस बॉस्टिक नावाच्या या २५ वर्षीय पिज्जा डिलिव्हरी बॉयने आपल्या जीवाची पर्वा न करता दाखवलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दुसऱ्याच्या जीवासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे मोजकेच असतात. या व्हिडीओवर अशाच प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पिज्जा डिलिव्हरी बॉयच्या या धाडसाची सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की डिलिव्हरी बॉय कसा ५ लहान मुलांना आगीने होरपळलेल्या घरातून सुखरूप बाहेर काढत आहे.
डिलिव्हरी बॉय बनला देवदूत ही संपूर्ण घटना अमेरिकेतील इंडियाना इथे घडली आहे, जिथे अचानक लागलेल्या आगीमध्ये एक घर जळून खाक झाले. यानंतर घटनास्थळावरून जात असलेला पिज्जा बॉय आपल्या जिवाची पर्वा न करता घरात शिरतो आणि ५ लहान मुलांचे जीव वाचवतो. मन विचलित करणारी दृश्ये व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत, आगीचा भडका उडत असताना देखील निकोलस नावाच्या डिलिव्हरी बॉयने आपला जीव धोक्यात घालून लहानग्यांना सुखरूप बाहेर काढले.
माहितीनुसार, पिज्जा डिलिव्हरी बॉय निकोलस आग लागलेल्या घराशेजारून जात होता, तेव्हा त्याची नजर आगीच्या भडक्याकडे गेली असता त्याने घटनास्थळी धाव घेतली. लक्षणीय बाब म्हणजे आगीने जळत असलेल्या घरात शिरून त्याने लहानग्यांना आपल्या खाद्यांवर घेऊन बाहेर काढले. या घटनेचा संपूर्ण थरार तिथे असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी कैद केला आहे. LafayetteINPolice या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.