आपल्याकडे डॉक्टरांनी औषध लिहून दिलेल्या चिठ्ठ्या अनेकवेळा व्हायरल होतात. डॉक्टरांच्या गडबडीत लिहिलेले अक्षर अनेकांना ओळखत नाही. अशीच एक चिठ्ठी आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मध्य प्रदेशातील सतना येथील एका रुग्णालयातील डॉक्टरांची चिठ्ठी व्हायरल होत आहे. डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन औषध दुकानदारांनी अनेक वेळा वाचण्याचा प्रयत्न केला, पण विचित्र लिखाणामुळे ते शक्य झाले नाही. या प्रकरणी आता डॉक्टरांना नोटीस बजावण्यात आली आहे.
डॉली चायवाला एका शोसाठी तब्बल किती पैसे घेतो? काय काय मागण्या करतो? झाला धक्कादायक खुलासा
सतना येथे एक सामुदायिक आरोग्य केंद्र आहे. येथे एक रुग्ण अंगदुखी आणि तापा आल्याचे सांगत रुग्णालयात गेला. येथे त्यांनी ओपीडीमध्ये डॉ.अमित सोनी यांची भेट घेतली. त्यानंतर डॉक्टर अमित सोनी यांनी प्रिस्क्रिप्शनवर औषधांची नावे लिहिली. हे प्रिस्क्रिप्शन घेऊन रुग्ण औषधाच्या दुकानात गेला, मात्र कोणाला औषधांची नावे वाचता आली नाहीत. त्या रुग्णाने शहरातील अनेक मेडिकलमध्ये जाऊन चिठ्ठी दाखवली. पण, कोणालाच यावर काय लिहिले आहे, हे वाचता येईना.
अरविंद सेन असे रुग्णाचे नाव आहे. तो राहिकवाडा गावचा रहिवासी आहे. दरम्यान, ही औषधांची चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीएमएचओने या प्रकरणाची दखल घेत डॉक्टरांना नोटीस बजावून त्यांचे उत्तर मागवले आहे. त्यांनी प्रिस्क्रिप्शन अशा हस्ताक्षरात का लिहिले आहे की ते वाचणे कठीण झाले आहे, याबाबत प्रश्न उपस्थित केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चिठ्ठीनुसार, रुग्ण ४ सप्टेंबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात गेला होता. रुग्णाचे वय ४६ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनवर लिहिलेले 'W आणि 255' हे दोन शब्द सोडले तर बाकीच्या ओळी वाकड्या आहेत. खाली लिहिले आहे की, हा फॉर्म सात दिवसांसाठी वैध असेल. हे रुग्णालय सरकारी आहे. या प्रिस्क्रिप्शनसाठी रुग्णाकडून पैसे घेतले नाहीत.
नागोड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या अनेक गावातील लोक उपचारासाठी येतात. या रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. रुग्णालयातील डॉक्टरांनी लिहिलेल्या हस्ताक्षरावरही उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. ओरिसा उच्च न्यायालयाने अशाच एका घटनेची सुनावणी करताना डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन आणि इतर अहवाल स्पष्टपणे किंवा मोठ्या अक्षरात लिहावेत, असे सांगितले होते.