तुमकुरू ।
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या अशीच एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. कारण कर्नाटकातील तुमकुरू जिल्ह्यातील एका पोपटाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कारण इथे एका कुटुंबियांनी चक्क पोपटासाठी पोस्टर लावले आहेत, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की आमचा हरवलेला पोपट जो कोणी शोधून देईल त्याला ५० हजार रूपयांचे बक्षीस दिलं जाईल. मात्र एका पोपटाला शोधून देणाऱ्याला तब्बल ५० हजार रूपयांचे बक्षीस ऐकून सर्वचजण गोंधळून गेले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे एवढं मोठं बक्षीस देण्यामागे देखील एक खास कारण आहे. कारण हा पोपट संबंधित कुटुंबियांच्या घरातील महत्त्वाचा सदस्य आहे.
दरम्यान, या पोपटाचे मालक रवी यांनी सांगितले की, त्यांच्या कुटुंबियांनी तुमकुरू जिल्ह्यातील जयनगर भागात असलेल्या आपल्या घरात दोन आफ्रिकन राखाडी रंगाचे पोपट पाळले आहेत. या पोपटाचे नाव 'रूस्तूमा' असं असून रूस्तूमा हा १६ जुलै रोजी हरवला आहे. रूस्तूमाला शोधण्यासाठी कुटुंबियांनी शहरात चक्क पोस्टर लावले आहेत आणि आजूबाजूच्या लोकांना दिसल्यास कळवण्याचे आवाहन केले आहे. पोस्टरमध्ये म्हटलं आहे की, "चुकून आमचा पोपट उडून गेला आहे, आम्ही येथील लोकांना आवाहन करतो की तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे पोपट दिसला तर जरूर कळवा. तो जास्त दूर जाऊ शकत नाही."
पोपटाला शोधा आणि मिळवा बक्षीसआमच्या घरातील एक सदस्य हरवल्याने आम्हाला दु:ख झालं आहे असं कुटुंबियांनी सांगितले. तसेच आम्ही सर्वांना याबाबत माहिती देण्याचे आवाहन करत आहोत जर कोणी पोपटाला माघारी दिले तर त्या शोधणाऱ्या व्यक्तीला ५०,००० रूपयांचे बक्षीस दिले जाईल असे पोस्टरमध्ये लिहण्यात आलं आहे. दरम्यान पोपटाच्या मालकाने सांगितले की, "मी प्राण्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या एका संघटनेसोबत काम करतो. तसेच आमच्या कुटुबांला पोपटाची खूप आवड आहे. आम्ही आता रूस्तूमाला खूप मिस करत आहे. कारण आम्ही त्याच्यासोबत खूप छान वेळ घालवला आहे." विशेष म्हणजे या दोन्ही पोपटांचा वाढदिवस कुटुंबीय दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा करतात. पोपटाच्या कुटुंबाचा सहवास आणि हरवलेला पोपट शोधून परत मिळवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना पाहून सोशल मीडियावर या घटनेची खूप चर्चा रंगली आहे. तसेच पक्षीप्रेमी या कुटुंबांचे कौतुक देखील करत आहेत.