पेडपल्ली: सध्या सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे, राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बाप लेकाच्या प्रेमाची अनेक उदाहरणे आहेत. तुरूंगात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, त्यानंतर त्यांना तुरूंगातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे वडील वासुदेव यांनी डोक्यावर टोपली घेऊन यमुना नदी पार केली, हा इतिहास आहे. सततच्या पावासामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पूरस्थिती उद्भवली आहे, त्यामुळे अनेक धक्कादायक दृश्ये समोर आली आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो बाहुबली चित्रपटाची आठवण करून देत आहे. कारण या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या लहानग्याला डोक्यावर घेऊन पुरातून जीवघेणा प्रवास करत आहे.
पुराच्या पाण्यात एक कुटुंब अडकल्याती घटना समोर आली आहे. तेलंगणातील पेडपल्ली जिल्ह्यातील मंथनी शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला प्लास्टिकच्या टबमध्ये घेऊन जीवघेणा प्रवास केला आहे. एक महिला त्या व्यक्तीच्या बाजूने चालत असून पुराच्या मार्गातून बाहेर निघताना पाहायला मिळत आहे. सुदैवाने त्या मुलाला सुरक्षित स्थळी नेण्यात यश आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इंस्पायर्ड आशु नावाच्या एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "खऱ्या आयुष्यातील बाहुबली, मंथनी या पूरग्रस्त गावात एक माणूस एका लहान मुलाला डोक्यावर टोपलीत घेऊन जात आहे."
तेलंगणात पावसाने घातला हाहाकार
तेलंगणात पावसाची संततधार सुरू असून मोठ्या प्रमाणात पूरस्थिती उद्भवली आहे. पुरामुळे तेलंगणातील गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी ६७.०१ फुटांवर गेलेली आहे. भद्रातलम शहरात आताच्या घडीला पाण्याची पातळी ६१ फुटांवर पोहोचली आहे. ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. अजनेयेलू स्वामी मंदिर पाण्याखाली गेले आहे. गोदावरी नदीची पातळी वाढल्याने भद्रादी मंदिर आणि अन्नदानम परिसरही पाण्याखाली गेला आहे. स्थानिकांना आपत्कालीन परिस्थितीतच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.