कॅडबरी कंपनीच्या बोर्नव्हिटाबाबत कोणाला माहिती नाहीय? फार गरीब नाही परंतू आजकाल अनेकांच्या घरात लहान मुलांना दुधातून हे मिसळून दिले जाते. लहान मुलेच नाहीत तर मोठे देखील बोर्नव्हाटा टाकून दूश पितात. परंतू, या बोर्नव्हिटाबाबतच्या एका न्युट्रिशिअनिस्टने केलेल्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली होती. यावर आता खुलासे देखील आले आहेत.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेल्या एका तरुणाने एक मिनिटाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये त्याने बोर्नव्हिटामध्ये अधिक मात्रेमध्ये साखर आणि घातक रसायने असल्याचे म्हटले होते. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी बोर्नव्हिटाला बॉयकॉट करण्याची मागणी केली होती. यावरून वाद सुरु होताच कंपनीने या तरुण न्युट्रिशिअनिस्टला कायदेशीर नोटीस पाठविली होती. यामुळे या तरुणाला त्याची पोस्ट हटवावी लागली आहे.
इन्फ्लुएंसर रेवंत हिमतसिंगकाने हा व्हिड़ीओ पोस्ट केला होता. जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करून बोर्नव्हिटाच्या गोडपणावर प्रश्न उपस्थित केले होते. बोर्नव्हिटामध्ये मोठ्या प्रमाणात साखर असल्याचे त्याने म्हटले होते. कोको सॉलिड्स आणि कॅन्सर निर्माण करणारे रंग असतात. जे मुलांसाठी घातक ठरू शकते, असेही त्याने म्हटले होते.
बोर्नव्हिटा हे लहान मुलांसाठी आरोग्यदायी पेय म्हणून विकले जाते. यामुळे रेवंतचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. लोक कंपनीवर प्रश्न उपस्थित करू लागले होते. यामुळे कंपनी देखील अॅक्शनमध्ये आली आणि अखेर रेवंतने तो व्हिडीओ माफी मागून काढून टाकला. असे असले तरी तोपर्यंत याला 12 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते. महत्वाची बाब म्हणजे अभिनेता आणि राजकारणी परेश रावल आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनीही हा व्हिडिओ शेअर केला होता.
व्हिडिओ बनवल्याबद्दल मी कॅडबरीची माफी मागतो. कोणत्याही ट्रेडमार्कचे उल्लंघन करण्याचा किंवा कोणत्याही कंपनीची बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता आणि कायदेशीर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी मला स्वारस्य किंवा संसाधने नाहीत. मी बहुराष्ट्रीय कंपन्यांना विनंती करतो की त्यांनी कायदेशीर मार्गाने हे प्रकरण पुढे नेऊ नये, असे आता रेवंतने म्हटले आहे.
यानंतर कंपनीने एक निवेदन जारी केले. रेवंतचे दावे हे अवैज्ञानिक आहेत आणि त्याने तथ्यांचा विपर्यास केला आहे आणि खोटे आणि नकारात्मक निष्कर्ष काढले आहेत. कंपनीला 7 दशकांहून अधिक काळापासून भारतीय ग्राहकांचे प्रेम मिळत आहे. बोर्नव्हिटामध्ये व्हिटॅमिन ए, सी, डी, लोह, जस्त, तांबे आणि सेलेनियम पोषक घटक असतात, ते रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, असे म्हटले आहे.