Social Viral : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये त्याच्या बहिणीला चढता आलं नाही. कशी-बशी ती आतमध्ये आली पण तिचा लहान मुलगा रेल्वे फलाटावरच राहिला. दरम्यान, एका एसी कोचमधून प्रवास करताना आलेला अनुभव एका तरूणाने सोशल मीडियावर व्यक्त होत सांगितला. त्यासोबतच या तरूणाने ट्रेनच्या एंट्री गेटचा फोटो शेअर करत हा सगळा प्रकार घडल्याचं कारणंही सांगितलं. या व्हायरल फोटोमध्ये एसी ट्रेनच्या दरवाज्यापर्यंत प्रवासी बसलेले दिसतायत. या गर्दीमुळे त्याच्या बहिणीला ट्रेनमध्ये चढणं जमलं नाही आणि नाहक त्रास सहन करावा लागला. पण तिचं लहान लेकरू बाहेरच राहिलं.
रचित जैन असं या तरूणाचं नाव आहे. त्याचबरोबर त्याने लिहलंय की, आपल्या मुलांसाठी माझ्या बहिणीला चालत्या ट्रेनमधून उडी मारण्याची वेळ आली. त्यामुळे तिला दुखापतही झाली आहे. आरामदायी प्रवास करण्यासाठी पैसे भरून सुद्धा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर ही एक चिंताजनक बाब आहे. प्रवाशांच्या गर्दीमुळे शौचालयासारख्या सुविधांचा वापर त्यांना करता येत नाही, या मुद्यांकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी तरूणाने केलेली पोस्ट तुफान व्हायरल होतेय.
या फोटोमधून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, फुकट्या प्रवाशांमुळे ही सर्व स्थिती निर्माण झाली आहे. ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता रेल्वे प्रशासनाने यावर ठोस पावले उचलावी असं या तरूणाचं म्हणणं आहे. ट्रेनमधील प्रवाशांच्या आरामदायी आणि सुखकर प्रवासाकरिता त्वरित कारवाई करा, अशी मागणी त्याने संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना केल्याची पाहायला मिळतेय. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाचा सूर उमटला आहे.
या व्हायरल पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. ''गेल्या महिन्यात ट्रेनमधून प्रवास करताना मला देखील असा अनुभव आला, आणि आश्चर्याची बाब म्हणजे यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही'' अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तसेच दुसऱ्या यूजरने म्हटलंय, ''या गोष्टीकडे रेल्वेने पूर्णपणे कानाडोळा केला आहे''.