सोशल मीडियाच्या या जगात कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. हास्यास्पद तितक्यात संतापजनक आणि अनोख्या घटना व्हायरल होत असतात. आता याच सोशल मीडियामुळे एक विवाहित महिला लंडनहून थेट भारतात आली. खरे तर तेलंगणातील हैदराबादमधील एका टॅक्सी चालकासाठी संबंधित महिला भारतात आली. त्यानंतर तिनेच तिच्या पतीकडे किडनॅपिंग केल्याचे सांगितले आणि मग हे प्रकरण पोलिसात पोहोचले. फोन नंबरच्या आधारे पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करुन महिलेला शोधले आणि लंडनला पाठवण्यास मदत केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील अलवल येथील हे प्रकरण आहे. ह्या विवाहित महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. १७ वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. काही कालावधीपूर्वी तिच्या पतीला लंडन येथे नोकरी लागली. त्यानंतर काही दिवसांतच तिच्या सासूचे निधन झाले. त्यावेळी पीडित महिला सासरच्या घरी होती. तेव्हा तिने माहेरी परतण्यासाठी टॅक्सी बुक केली. महिलेने गुगल पेच्या माध्यमातून टॅक्सी चालकाला पैसे दिले होते.
ऑनलाइन पैसे देताच महिलेचा नंबर टॅक्सी चालकाकडे गेला. मग चालकाने तिला मेसेज करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम महिलेने या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला. पण, हळू हळू या दोघांमध्ये मैत्री झाली. त्यांच्यातील संवाद वाढल्याने तिच्या सासरच्या मंडळीला संशय आला आणि त्यांनी परदेशात असलेल्या तिच्या पतीला याची माहिती दिली. दरम्यान, महिलेच्या पतीला हे सर्व कळताच त्याने पत्नी आणि मुलांना लंडनला नेले. त्यांची लंडनहून भारतात ये-जा सुरू असायची. एके दिवशी महिला मुलांना घेऊन गार्डनमध्ये गेली असता ती संबंधित टॅक्सी चालकाशी फोनवर बोलत असताना अचानक तिथून गायब झाली. हा सर्वप्रकार तिच्या मुलांनी वडिलांच्या कानावर घातला. पण, तोपर्यंत तिने भारताकडे कूच केली होती. तेव्हा फोन बंद लागला मात्र कालांतराने फोन लागला असता महिलेने मला किडनॅप केले असल्याचे आपल्या पतीला सांगितले. पतीने पोलिसांशी संपर्क साधून आपबीती सांगितली. मग हैदराबाद पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करुन महिलेची सुटका केली. आरोपी टॅक्सी चालकाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.