रायपूर : माणसाने नेहमीच एकमेकांशी ईमानदारीने राहावे असे घरातील ज्येष्ठ नागरिक नेहमी सांगत असतात. ईमानदारी असेल तरच तुम्हाला जगात एक वेगळी ओळख मिळते असे बोलले जाते. समाजातील इतर लोक देखील ईमानदार व्यक्तीवर विश्वास दाखवतात आणि त्यांना सन्मान देतात. याचाच प्रत्यय देणारी घटना छत्तीसगढमधील रायपूर येथे घडली आहे, जिथे एका स्थानिक पोलीस कॉंस्टेबलने आपल्या ईमानदारीने अनेकांची मने जिंकली आहेत. झाले असे, की संबंधित पोलीस हवालदाराला रस्त्यावर एक अज्ञात बॅग सापडली यामध्ये तब्बल ४५ लाखांची रक्कम होती.
एवढी मोठी रक्कम आपल्याकडे न ठेवता संबंधित हवालदाराने पोलीस ठाण्यात जमा केली. कोणत्याही लोभाशिवाय त्याने एवढी रक्कम जमा केल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या घटनेची सोशल मीडियावर चर्चा रंगली असून नेटकरी या हलावदाराच्या ईमानदारीचे कौतुक करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बॅगमधील काही बंडलमध्ये पाचशे आणि दोन हजार रूपयांच्या नोटा होत्या. मात्र पोलीस हवालदार निलांबर सिन्हा यांनी याची कोणालाच कल्पना न देता ही बॅग पोलीस ठाण्यात जमा केली. सिन्हा हे एक ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आहेत.
सिन्हा यांनी ईमानदारीने जिंकली अनेकांची मनेशनिवारी सकाळी जवळपास साडे आठच्या सुमारास सिन्हा यांना पैशांनी भरलेली बॅग सापडली. बॅगेमध्ये नोटांचे काही बंडल होते, पोलिसांनी नोटा मोजल्या असता जवळपास ४५ लाखांची रक्कम असल्याचे उघड झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी सिन्हा यांच्या ईमानदारीमुळे त्यांचा विशेष सन्मान केला आहे. याशिवाय बॅग नक्की कोणाची आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र आता सिन्हा यांच्या ईमानदारीची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू असून त्यांनी आपल्या ईमानदारीने अनेकांची मने जिंकली आहेत.