Viral Video : तुमच्यापैकी बहुतांश लोकांनी 'टायटॅनिक' चित्रपट पाहिला आहे. शंभर वर्षांपूर्वी घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात एक भलेमोठे प्रवासी जहाज ग्लेशियरला धडकून समुद्रात बुडाल्याचे दाखवण्यात आले आहे. समुद्रात अशाप्रकारच्या घटना अनेकदा घडतात. कधी ग्लेशियर तर कधी समुद्राच्या उंच लाटांमुळे मोठ-मोठी जहाज खवळत्या समुद्रात सामावून जातात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला टायटॅनिकच्या क्लायमॅक्सची आठवण येईल.
व्हिडीओमध्ये एक भलेमोठे जहाज खवळत्या समुद्रात कैक मीटर उंच लाटांचा सामना करताना दिसत आहे. हे मालवाहून जहाज या महाकाय लाटांमधून आपला मार्ग काढत पुढे जात आहे. हा व्हिडिओ पाहूनच सामान्यांचा थरकाप उडू शकतो, तर त्या जहाजात असलेल्या लोकांची काय अवस्था झाली असेल? याचा विचारही करवत नाही.
हा व्हिडिओ @Amazingnature अकाउंटवरुन शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील हे अकाउंट नेहमीच अशाप्रकारचे व्हिडिओ शेअर करते. मात्र, हा व्हिडिओ केव्हाचा आणि कुठचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्या?सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेक युजर्सनी टायटॅनिक चित्रपटाच्या क्लायमॅक्सची आठवण करून देणारे वर्णन केले, तर काहींनी जहाजाची ताकद आणि त्याच्या क्रूच्या धैर्याची प्रशंसा केली आहे. एका यूजरने लिहिले - हे जहाज खरोखरच लाटांशी लढणाऱ्या योद्ध्यासारखे दिसते. काहींनी जहाज सुरक्षित परत येण्यासाठी प्रार्थना केली. एवढ्या वादळात हे जहाज कसे अडकले, असा सवालही सोशल मीडियावर अनेकजण करत आहेत.