Social Viral : नागरिकांनी येत्या निवडणुकीत मतदान केलेच पाहिजे, यासाठी विविध राजकीय पक्ष, नागरी व सामाजिक संस्था, व्यक्तीकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींसह विविध रील्स आणि पोस्टच्या माध्यमातून लोकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती घडवून आणत आहेत. त्यातच पुण्यात एका विवाहाची निमंत्रणपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. ही पत्रिका आहे चि. मतदार आणि चि. सौ.कां. लोकशाही यांच्या लग्नाची. पुणेकरांनी तरुणाईला मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी ही अनोखी शक्कल लढवली आहे.
१३ मे रोजी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. हा मतदान साेहळा जणू विवाह सोहळाच असल्याची कल्पना करून १८ वर्षांवरील प्रत्येक मतदाराला वऱ्हाडी संबोधून ही निमंत्रण पत्रिका तयार केली आहे. या लग्नपत्रिकेत मतदार ‘वर’ असून लोकशाही ‘वधू’ आहे. मतदार हा देशाच्या नागरिकांचा ज्येष्ठ चिरंजीव आहे, तर लोकशाही ही संविधानाची ज्येष्ठ कन्या आहे. या दोघांचा शुभविवाह १३ मे रोजी सकाळी ७ ते संध्याकाळी ५ या शुभ मुहूर्तावर होणार आहे, असा उल्लेख लग्नपत्रिकेमध्ये केला आहे.
लग्न पत्रिकेत नेमकं काय लिहिलंय?
वैशाख शु. १२ सोमवार १३ मे २०२४ रोजी, सकाळी ७ ते सायंकाळी ५ या शुभ मुहूर्तावर लोकसभा २०२४ च्या निमित्ताने भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याची सुसंधी, उज्ज्वल भारताची स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपले एक पाऊल, आपला आवाज संसदेत पाठवण्यासाठी आपल्या एक-एक मतदानरूपी आशीर्वादाने हा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हावा हेची निमंत्रण अगत्याचे...! असं पत्रिकेत लिहिलं आहे.