नवी दिल्ली- १२ ज्योतिर्लिंगांशिवाय देशात भगवान शंकराची अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरे आहेत, मात्र यातील एक धर्मस्थळ असे देखील आहे जिथे लोक खासकरून कर्ज आणि ऋण मुक्तीसाठी हजेरी लावत असतात. उल्लेखनीय बाब म्हणजे यामुळेच या मंदिराला ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर म्हटले जाते. या मंदिरात विराजमान असलेले ऋणमुक्तेश्वर महादेव लोकांची कर्जापासून मुक्तता करतात आणि त्यांचे आर्थिक संकट दूर करतात, अशी श्रद्धा आहे.
भारतातील अनोखं मंदिर
भारतातील हे अनोखं मंदिर मध्य प्रदेशातील कुकर्रामठ गावामध्ये आहे. असे म्हटले जाते की, हे मंदिर हजारो वर्षे जुनं आहे, तर काही लोकांच्या मते हे मंदिर आठव्या शतकातील आहे. तसेच मंदिर कलचुरी काळातील असल्याचे देखील सांगितले जाते. कलचुरी नरेश कौशल्या देव यांच्या सहाय्याने तत्कालीन शंकराचार्यांनी गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हे मंदिर बांधले होते असा अनेकांचा समज आहे. तेव्हापासूनच या मंदिराची ख्याती ऋणमुक्तेशवर म्हणून सर्वत्र पसरली आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी येथे सहा मंदिरांचा समूह होता, पण आता एकच मंदिर राहिले आहे. सध्याच्या घडीला उरलेल्या या एका मंदिराची अवस्था खूप वेगळी झाली आहे. मुख्य मंदिर एका मोठ्या चौथऱ्यावर बांधले आहे, तिथे एक विशाल शिवलिंग आहे तसेच बाहेर नंदीची मूर्ती देखील आहे. विशेष म्हणजे प्राचीन स्मारक पुरातत्व स्थळ संरक्षण कायदा १९५८ अंतर्गत मंदिराला संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले आहे. सध्या याची देखभाल मध्य प्रदेश राज्यातील पुरातत्व विभागाकडे असून, हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे.
ऋणा'तून मुक्त होण्यासाठी भक्त लावतात हजेरी
दरम्यान, लोकांची भावना आहे की, इथे जो कोणीही स्वच्छ भावनेने येतो आणि भगवान शंकराची पूजा करतो, त्या व्यक्तीला मातृ ऋण, पितृ ऋण, देव ऋण आणि गुरू ऋण यांपासून मुक्ती मिळते. खासकरून पूजेसाठी दूरवरून भाविक या तीर्थस्थळाला भेट देत असतात. सोमवार व्यतिरिक्त श्रावण महिना, महाशिवरात्री, नागपंचमी अशा इतर सणांना येथे मोठी गर्दी असते. लोक येथे प्रदक्षिणा घालण्यासाठी देखील हजेरी लावतात.