Ratan Tata : भारताचे अमूल्य 'रत्न', म्हणजेच दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 86 वर्षीय रतन टाटा यांनी 9 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी अर्पण केलेल्या रतन टाटांच्या मृत्यूने देशातील प्रत्येकाचे डोळे पाणावले. त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांना भारतरत्न देण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, रतन टाटा यांना गुजरातमधील एका हिरे व्यापाऱ्याने अनोखी श्रद्धांजली दिली आहे.
हिऱ्यापासून बनवला रतन टाटांचा फोटो रतन टाटांचे चाहते आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अशातच, सूरतच्या एका हिरे व्यापाऱ्याने तब्बल 11000 अमेरिकन हिऱ्यांच्या मदतीने रतन टाटांचे अप्रतिम पोर्ट्रेट बनवले आहे. विपुलभाई जेपीवाला, असे हे पोर्ट्रेट बनवणाऱ्या कलाकाराचे नाव आहे. त्यांनी दिवंगत रतन टाटांचे हिऱ्यांच्या साहाय्याने मोठे पोर्ट्रेट बनवून त्यांना अनोखी भावनिक श्रद्धांजली अर्पण केली.
फोटो बनवण्यासाठी 11000 हिऱ्यांचा वापर पोर्ट्रेट बनवणाऱ्या या कलाकाराचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कलाकाराने लहान अमेरिकन हिऱ्यांनी त्यांचे मोठे चित्र बनवले आहे. हे पोर्ट्रेट हुबेहुब दिवंगत रतन टाटा यांच्यासारखे दिसते. या अवघड कामासाठी कलाकाराची स्तुती करावी तेवढी कमी आहे. हिऱ्यांपासून बनवलेले हे पोर्ट्रेट अतिशय चमकदार आहे.
व्हिडिओ पाहून सगळेच भावूक हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला आहे. हिऱ्यांनी बनवलेले दिवंगत रतन टाटांचे चित्र पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. ते तयार करणारे व्यापारी आणि कलाकार विपुलभाई जेपीवाला यांचे लोक कौतुकही करत आहेत. तसेच, हे पोर्ट्रेट पाहून अनेकजण भावूकही झाले. त्यांनी कमेंट करून रतन टाटांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.