नवी दिल्ली : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एका माजी लष्करी अधिकाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांनाच धक्का बसत आहे. कारण आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडीओ राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल ट्रेनर सुभेदार मेजर गोविंद स्वामी यांचा आहे. मेजर स्वामींना त्यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील 100 वर्षीय माजी सैनिकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये माजी लष्करी अधिकाऱ्याची जिद्द पाहून महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा खूपच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मेजर स्वामीं यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन मद्रास सॅपर्सने बंगळुरूमध्ये केले होते. या कार्यक्रमात मेजर स्वामी आल्यावर काही अधिकारी मिळून त्यांना कारमधून बाहेर काढतात आणि व्हीलचेअरवरून स्टेजवर आणतात. मेजर स्वामींना व्यवस्थित हालचाल करणे देखील खूप कठीण जात आहे हे व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी मेजर स्वामी अधिकाऱ्यांना सलाम करत आहेत. हे पाहून स्वामींनी ज्या भावनेने सलाम केला त्या भावनेला सर्वजण 'सलाम' ठोकत आहेत. ही सलामी पाहून आनंद महिंद्राही स्वामी यांचे चाहते झाले आहेत.
आनंद महिंद्रा झाले प्रभावितआनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यांनी आता पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "सब मेजर स्वामी, राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी ड्रिल इन्स्ट्रक्टर यांचा 100 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला जात आहे. त्यांनी 7 भारतीय लष्करी सेनापतींना 'सैन्य' तसेच आपल्या गुरूंचा आदर करण्याची भारतीय परंपरा सांगितली. जेव्हा त्यांनी सलाम ठोकला ते पाहून माझ्याही अंगावर शहारे आले." आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओला 4 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले असून 5 लाखांहून अधिक लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे.