नवी दिल्ली : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. आजच्या धावपळीच्या जगात रस्त्यावर सुरक्षेची खात्री दिली जाऊ शकत नाही. कारण बहुतांश मंडळी संयम सोडून वाहने चालवत असतात. याचाच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. खरं तर हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बरेलीचा आहे.
दरम्यान, या व्हिडीओमध्ये 3 बाईकवर बसलेले 14 लोक प्रचंड वेगाने स्टंट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील युजर्स चांगलेच संतापले आहेत. व्हिडीओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली आहे.
पोलिसांनी केली कारवाई वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशातील बरेलीच्या देवरानिया पीएस परिसरातील आहे. इथे 14 लोक 3 बाईकवर स्वार झाले असून एका गाडीवर 6 आणि दोन गाडीवर 4 जण बसले आहेत. बरेलीचे एसएसपी अखिलेश कुमार चौरसिया यांनी म्हटले की, माहिती मिळताच दुचाकी जप्त करण्यात आल्या असून पुढील कारवाई केली जात आहे.
नेटकरी संतापले पोलिसांनी कारवाई केली असली तरी सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले. अनेक सोशल मीडिया युजर्सनी प्रश्न उपस्थित करत लिहिले आहे, "हे लोक खरंच मृत्यूला घाबरत नाहीत का?" या व्हिडिओवर प्रश्न उपस्थित करताना आणखी एका युजरने या लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी असे म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"