नवी दिल्ली : जवळपास 3 वर्षांपूर्वी चीनमधील वुहान शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. तेव्हापासून मागील दोन वर्षे या घातक आजाराने जगजीवन विस्कळीत केले होते. जगभरातील बहुतांश ठिकाणी त्याची झळ आजतागायत बसत आहे. याच आजारामुळे पहिल्यांदाच लोकांना लॉकडाऊन आणि क्वारंटाईन यांसारखे शब्द ऐकायला मिळाले. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या या विषाणूने सर्वत्र कहर केला होता. मात्र लस आल्यानंतरही लोकांची या विषाणूपासून पूर्णपणे सुटका झालेली नाही. जगातील अनेक देशांमध्ये सातत्याने कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. ज्या देशात या विषाणूचा जन्म झाला होता त्या चीनमध्ये पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रूग्ण सापडत आहेत. अलीकडेच चीनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये क्रेनच्या सहाय्याने रुग्णाला तेथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नेण्यात आले.
क्रेनच्या साहाय्याने एका व्यक्तीला घराच्या वरच्या मजल्यावरून बाहेर काढण्यात येत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा दावा केला जात आहे. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे चीन सरकार कठोर भूमिका घेत आहे. तिथे झिरो कोविड पॉलिसी राबवली जात आहे. ज्या परिसरात रुग्ण आढळेल तो भाग सील करण्यात येत आहे.
चीनमध्ये कडक नियमावली कोरोनाबाबत चीनमध्ये अद्याप काही कठोर निर्बंध आहेत मात्र तरीदेखील शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. बुधवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये 19 नवीन रुग्ण आढळले. बीजिंग हे चीनचे एकमेव मोठे शहर आहे ज्याने अद्याप संपूर्ण लॉकडाऊन लावण्यात आले नाही. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला नॅशनल गोल्डन हॉलिडेनंतर संसर्ग वाढत असल्याचे बोलले जात आहे. मागील गुरुवारी प्रकरणांमध्ये विक्रमी वाढ झाल्यामुळे बीजिंगमधील काही गृहनिर्माण वसाहती आणि खरेदी केंद्रे बंद करण्यात आली होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"