नवी दिल्ली : राजस्थानमध्ये एका कुत्र्यासोबत कथितपणे केलेल्या क्रूरतेची घटना समोर आली आहे. कुत्र्याला धावत्या गाडीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. कुत्रा देखील नाईलाजास्तव कारच्या मागे धावताना दिसत आहे. यावेळी असहाय्य झालेल्या कुत्र्याला पाहून अनेकांनी कार चालकाविरूद्ध प्रश्न उपस्थित केले आहेत. हा सर्व थरार घडत असताना तेथून जाणाऱ्या काही लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित चालक पेशाने डॉक्टर असल्याचे उघड झाले आहे.
चालक डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, ही घटना राजस्थानधील जोधपूर येतील असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी दवाखान्यातील डॉक्टराविरूद्ध कुत्र्याला गाडीला बांधून फरफटत नेल्याप्रकरणी 18 सप्टेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहितेचे कलम 428 प्राण्याला मारणे किंवा इजा पोहचवणे आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम ११ या अंतर्गत डॉ. रजनीश गलवा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती शास्त्रीनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी जोगेंद्र सिंग यांनी दिली.
कुत्र्याच्या पायाला गंभीर दुखापत खरं तर आरोपी डॉ. रजनीश गलवा यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एसएन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक दिलीप कछवाहा यांनी म्हटले की, आरोपीला कारणे दाखवा नोटीस पाठवून 24 तासात उत्तर देण्यास सांगितले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांपैकी काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला होता. याशिवाय चालक डॉक्टराला गाडी थांबवण्याचा आग्रह देखील करण्यात आला. दरम्यान, 'डॉग होम फाऊंडेशन'च्या केअरटेकरने सांगितले की, कुत्र्याच्या एका पायाला गंभीर दुखापत झाली आहे, तर दुसऱ्या पायाला आणि मानेला जखमा आणि किरकोळ दुखापत झाली आहे.