नवी दिल्ली : पेट्रोल पंपाजवळ (Petrol Pump) ज्वलनशील पदार्थ अथवा मोबाईल वापरण्यास मनाई असते. जगभरातील सर्वच पेट्रोल पंपावर अशा आशयाचे पोस्टर पाहायला मिळतात. मात्र तरीदेखील लोक नियमांचे उल्लंघन करतात आणि मग मोठ्या दुर्घटना घडतात. पेट्रोल पंपावर ज्वलनशील पदार्थ बाळगल्याने आग लागण्याची दाट शक्यता असते. असाच एक धक्कादायक प्रकार रशियातील एका शहरात घडला आहे. आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना व्यक्तीला सिगारेट ओढण्याचा मोह आवरला नाही आणि त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले.
दरम्यान, रशियातील चेल्याबिन्स्क शहरातील एका पेट्रोल पंपावर एक व्यक्ती त्याच्या गाडीत पेट्रोल भरत होता. थोड्या वेळाने संबंधित व्यक्ती आपल्या खिशातून सिगारेट काढते आणि तोंडाला लावते तेवढ्यात दुर्घटनेला सुरूवात होते. त्या व्यक्तीने लायटर चालू करताच पेट्रोल पंपावर आगीचा भडका उडाला. तिथे असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
व्यक्तीचा निष्काळजीपणा नडला
व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे एवढी मोठी दुर्घटना घडली आहे. व्यक्तीने आगीचा भडका झाल्यानंतर भीतीपोटी गाडीतून पेट्रोलची पाइप काढली आणि पेट्रोल खाली सांडल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. विशेष म्हणजे आग लागताच सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीने आपली कार घेऊन तिथून पळ काढला. त्याच्या गाडीचा मागील भाग देखील जळून खाक झाला आहे. नंतर तेथील कर्मचाऱ्यांनी Fire Extinguisher च्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आगीमुळे संपूर्ण पंप जळून खाक झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.