सतना : सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक लाजिरवाणा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. माणुसकीला लाजवेल असा हा व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधत आहे. गायीच्या मृतदेहासोबत क्रूरतेचा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. युजर्स प्रचंड संतापले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत आहेत. हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानले जाते. अशा परिस्थितीत लोकांच्या भावना दुखावण्याचे कामही हा व्हिडीओ करत असल्याचे बोलले जात आहे. क्रूरतेचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक हिंदू संघटनांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील आहे. येथे शहराच्या बाहेरील पेप्टेक सिटी टाऊनशिपजवळील एका ढाब्याजवळ गायीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ढाब्याच्या मालकाने तेथून मृतदेह काढण्यासाठी जेसीबी बोलावला. गायीचा मृतदेह जेसीबीने फरफटत नेऊन ढाब्यापासून लांब फेकण्यात आला. गाईवर असे क्रूर कृत्य होत असताना तेथून जाणाऱ्या कार चालकाने हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. गायीचे दोन्ही पाय जेसीबीने बांधून ओढले जात असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.
ढाबा चालकाने दिले स्पष्टीकरण
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक आणि महापालिकेचे आयुक्त यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल करून जेसीबी चालक व ढाबा मालकावर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाब्याचे मालक अटल प्रताप सिंग यांनी सांगितले की, गायीच्या मृतदेहावर मोठ्या प्रमाणात माशांचे साम्राज्य होते, त्यामुळे कोणीही मृतदेह टाकण्यास तयार नव्हते. या कारणास्तव जेसीबी मागवावा लागला. गायीला अशाप्रकारे रस्त्यावर ओढत नेत असल्याचा व्हिडीओ समोर आल्याने हिंदू संघटना आणि गोसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून या घटनेबद्दल सर्वजण खेद व्यक्त करत आहे. खरं तर हा व्हायरल व्हिडीओ राकेश कुमार पटेल नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.