देशातील बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे आगमन झाले असले, तरी अद्याप अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. राज्यातील ग्रामीण भागातही भीषण परिस्थिती आहे. दिल्लीसारख्या शहरात देखील पाण्याची कमतरता जाणवत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ दिल्लीत काय परिस्थिती आहे हे दाखवतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाटीभर पाण्यासाठी देखील मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे दिसते. मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे देशातील बहुतांश भागाला कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागला.
पुण्यासारख्या शहरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पाणी रस्त्यावर तुंबत असून, शहरातील काही भागांना नदी-नाल्याचे स्वरूप आले. पण, ग्रामीण भागात आजही कोरडा दुष्काळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील माण-खटाव परिसरातील लोकांसाठी हा संघर्ष नवा नाही. पण, दरवर्षीच्या तुलनेत यावेळी त्यांना यंदा पाण्यासाठी खूपच वणवण फिरावे लागले. येथील अनेक गावांमध्ये चार दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो.
अंगावर काटा आणणारे दृश्य
हे सोशल मीडियाचे जग आहे इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये लोक पाण्यासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. याशिवाय वाटीभर पाण्यासाठी किती संघर्ष करत आहेत हे व्हिडीओतून स्पष्ट होते.
दरम्यान, व्हायरल होत असलेला व्हिडीओ समुद्राजवळील असल्याचा कळते. वाळूत छोटे-छोटे खड्डे खोदून लोक वाटीभर पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एक हंडा अथवा एक भांडे भरायला लागणारा वेळ आणि त्यासाठी असलेली भली मोठी रांग भीषण परिस्थितीचा अंदाज देते.
पाण्यासाठी संघर्ष करत असलेल्या लोकांना पाहून नेटकऱ्यांनी भावनिक प्रतिक्रिया दिल्या. कमेंटच्या माध्यमातून लोक यावर व्यक्त होत आहेत. "जल से ही कल है", "जल ही जीवन है" , अशा आशयाच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.