Social Viral : ओला, उबर यांसारखी वाहतुकीची साधनं लोकांच्या गरजेचा भाग बनली आहेत. अशा वाहतुकीच्या संसाधनांमुळे नागरिकांचा प्रवास सहज आणि सोपा झाला आहे. पण हे कॅब चालक देखील काही अंतर्गत समस्यांमुळे त्रस्त आहेत. याचा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल होणारी एक पोस्ट पाहून तुम्हाला नक्कीच येईल.
सध्या सोशल मीडियावर ओला, उबर चालकाने कारमध्ये लावलेली नोटीस चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एक्स प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या या नोटिसमध्ये लिहलंय की, प्रिय ओला, उबर ग्राहकांनो कॅबमध्ये एसीची मागणी करून चालकांना आत्महत्या करण्यास भाग पाडू नका. आधीच कंपनीने ३० ते ४० टक्के कमिशन आकारल्यामुळे आमचं कंबरड मोडलंय. त्यात तुम्ही सुद्धा आणखी भर घालू नका. जोपर्यंत कंपनी योग्य दर निश्चित करत नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य कराल, अशी मी अपेक्षा करतो.
शिवाय या नोटिसमध्ये पुढे असं लिहलंय, जर तुम्हाला गारेगार प्रवास अनुभवायचा असेल तर प्रतिकिलोमीटर ५ रुपये अशा हिशोबाने अतिरिक्त पैसे देत तुम्ही एसी ऑन करू शकता. अशा प्रकारची हटके सूचना देत या कॅब चालकाने त्याची व्यथा मांडली आहे. एक्सवर दिव्या टंडन नावाच्या एका यूजरने ही पोस्ट शेअर करत अन्य प्रवाशांना याबाबत माहिती दिली आहे. ही पोस्ट पाहून नेटकरी सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागलेत. कमेंट्सच्या माध्यमातून त्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर एक यूजरने कमेंट करत प्रवाशांना ऑटो रिक्षाने प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आणखी एक नेटकरी म्हणतो, "इमोशनल ब्लॅकमेल करने का तरिका थोडा क्यॅज्यूअल आहे", अशी थेट प्रतिक्रिया त्याने कमेंटच्या माध्यमातून दिली आहे.