Social viral : सोशल मीडियाने मानवी जीवनाची सर्वच अंगे व्यापून टाकली आहेत. हल्ली इंटरनेटच्या युगात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जग अगदीच जवळ आलं आहे. थोडक्यात, मानवी जीवनच सोशल मीडियाने व्यापून टाकलं आहे.
इंस्टाग्राम, यूट्यूब तसेच फेसबुकवर नियमितपणे कोणत्या ना कोणत्याही गोष्टींची चर्चा रंगताना दिसते. या सोशल साइट्सवर कधी काय व्हायरल होईल हेही सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. लहानश्या मांजराच्या पिल्लाला वाचवण्यासाठी या महिलेने केलेली धडपड पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
तुर्कीच्या इंस्तांबुल येथील हायवेवरील ही दृश्ये आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये या हायवेवर अतिशय वेगाने, सुसाट धावणाऱ्या वाहनांची वर्दळ असलेली पाहायला मिळतेय. पण या रस्त्याच्या मधोमध एक मांजरीच्या अडकलेल्या पिल्ल्यावर या महिलेची नजर जाते. रस्त्यावरून सुसाट जाणाऱ्या गाड्या पाहून ते पिल्लू घाबरतं आणि रस्त्याच्या मधोमध थांबत. हा प्रकार त्या महिलेच्या लक्षात येताच ती रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न करते.
स्वत: च्या जीवाची पर्वा न करता ती महिला भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमधून कशी-बशी वाट काढते. अखेरीस ती त्या पिल्लापर्यंत पोहचण्यास यशस्वी होते. आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेत ती सुखरुप त्यातून त्याची सुटका करते. या महिलेच्या कृत्यानं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
या व्हायरल व्हिडिओवर एका यूजरने Beautiful people with a beautiful heart अशी कमेंट केली आहे. तर काहींनी या महिलेसाठी कौतुक केल्याचं पाहायला मिळतं आहे.