मुंबई – सध्याच्या युगात सोशल मीडियावर टाकलेला व्हिडिओ, फोटो काही सेकंदात जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतो. एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर रातोरात संबंधित कलाकार सेलिब्रिटी बनतो. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशात बाजारात सगळीकडे सुंदर आकर्षक अशा गणरायाच्या मुर्तीही दिसत आहेत. गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर गणपतीची गाणी ऐकायला मिळत आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सर्वत आतुर आहेत.
इन्स्टाग्रामवर अलीकडे तुम्ही एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला पाहिला असेल. हा व्हिडओ आहे एका चिमुकल्याचा...’आमच्या पप्पांनी गणपती आणला” हे लहान मुलाचे गाणे इतके गाजले आहे की, प्रत्येकाच्या मुखातून ते ऐकायला मिळत असेल. याच गाण्यावर एका शाळकरी मुलाने केलेला इन्स्टा रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. जवळपास २० मिलियनहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर लाखोंनी लाईक्स आणि हजारो कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून अनेकजण या छोट्या मुलाचे चाहते झाले आहेत.
इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या मुलाचे नाव आहे साईराज गणेश केंद्रे...बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात कन्हेरवाडी या गावातील हा मुलगा आहे. अवघ्या ४ वर्षाच्या साईराजच्या एका रिलने इन्स्टाग्रामवरील सर्वांनाच वेड लावले आहे. साईराजच्या या व्हिडिओवर सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. साईराज हा दीड वर्षाचा असल्यापासून Instagramm वर रिल्स बनवत आहे. सुरुवातीला ‘ए आई मला पावसात जाऊ दे” हा साईराजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा साईराजचा आमच्या पप्पांनी गणपती आणला या गाण्यावरील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
साईराजचे आई-वडील दोघेही खासगी कंपनीत नोकरीला आहे. साईराजला असणारी आवड पाहून त्याच्या वडिलांनी त्याचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. आता साईराजचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की, रातोरात तो सेलिब्रिटी बनला आहे. २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर २ दिवसांत तो व्हायरल झाला. साईराजचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि लोकांकडून त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून त्याचे वडील गणेश केंद्रे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. साईराजसोबत लोकं फोटो काढतायेत हे पाहून माझा ऊर भरून येत आहे अशी प्रतिक्रिया गणेश केंद्रे यांनी दिली.
दरम्यान, कन्हेरवाडी येथील माऊली अनुराधादेवी इग्लिंश हायस्कूलमधील साईराज हा विद्यार्थी आहे. साईराजने शाळेच्या गणवेशात हा व्हिडिओ केल्याने त्याच्या शाळेचेही नावलौकीक झाले. शाळेतील शिक्षकांनीही साईराजचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. लवकरच साईराज केंद्र या बालकलाकाराचा शाळेकडून सत्कार करण्यात येईल अशी माहिती त्यांच्या शाळेने दिली आहे.
पाहा व्हिडिओ -