सांगोला - आजच्या धावपळीच्या जगात ऑनलाइन खरेदीवर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो. सोयीस्कर आणि आपल्याला हवी तशी वस्तू आपण ऑनलाइन ऑर्डर करू शकतो. किराणा माल, कपडे यांपासून ते जीवनाश्यक वस्तुंची खरेदी ऑनलाइरित्या करता येते. मात्र सांगोल्यातील एका शेतकऱ्याने ॲमेझॉनवरून चक्क ओली वैरण मागवली आहे. सध्या सांगोल्यातील या शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या 'काय झाडी काय डोंगार काय हाटील...सगळं ओके मधी हाय, यानंतर सांगोल्याच्या भाषेची सर्वांना भुरळ पडली होती. आता यामध्ये एका शेतकऱ्याची भर पडली असून त्याच्या या ऑर्डरने सर्वांनाच हशा पिकला आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ॲमेझॉनच्या महिला कर्मचाऱ्याशी संवाद साधताना शेतकरी राजेंद्र पाटील म्हणाले की, मॅडम ॲमेझॉनला फोन लागलाय का? समोरून उत्तर हिंदीत आल्यानंतर शेतकऱ्याने सांगितले मी मराठीत बोलतोय मला हिंदी थोडी थोडी येते. शेतकऱ्याने मराठीत बोलण्याचा आग्रह केल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने त्यांच्या टीममधील एका मराठी महिला कर्मचाऱ्याला लाइनवर घेतले. महिला कर्मचाऱ्याला ऑर्डरबद्दल माहिती दिल्यावर कर्मचाऱ्यालाही हसू आवरले नाही आणि त्यांनी शेतकऱ्याच्या अकाउंटबाबत विचारपूस केली.
नेमकं काय म्हटलं शेतकऱ्यानंमराठी कर्मचाऱ्याशी बोलताना शेतकऱ्यानं म्हटलं, "मॅडम मी सांगोला तालुक्यातून बोलतोय इथं चार दिवस इतका पाऊस आहे की रानात जायला येईना त्यामुळं आपल्याला दोन पेंडं वैरण पाहिजे होती वल्ली मिळंल का? यावर कर्मचाऱ्याने तुमच्याकडे अकाउंट आहे का याची विचारपूस केली. नंतर अकाउंट आहे म्हणत राजेंद्र पाटील म्हणाले, सकाळपासून म्हसाड ओरडाय लागलयं, रानात जायला येईना, चिखूल लय झालाय. त्यामुळे वल्ली वैरण दोन पेंड पाहिजे, बघा व मॅडम सकाळपासून म्हसरं लय ओरडायला लागलीतय. यावर कर्मचाऱ्याने तुम्ही ॲपमध्ये तपासा असा सल्ला दिला. मात्र मला त्यातील मला काय कळत नाही. आज संध्याकाळपर्यंत येईल का? असं शेतकऱ्यानं म्हटलं. ऑर्डर यायला दोन ते तीन दिवस लागतील, असं कर्मचाऱ्याने म्हणताच म्हसरं एवढं दिवस कस काढतील, अस म्हटलं.
शेतकऱ्याने केलेल्या अनोख्या ऑर्डरमुळे महिला कर्मचारी गोंधळून गेली आणि तिने तुमच्या ॲपमध्ये वैरण मिळते की नाही ते पाहते असं सांगितल. तुम्ही ऑर्डर करा भेटली तर सांगतो असं कर्मचाऱ्याने सांगितलं. अजून कोणती मदत हवी आहे का असं विचारल्यावर शेतकऱ्याने दुसरं काय बी नाय एवढीच एक मोठी गरज असल्याचं म्हणत जनावरं एवढं दिस कशी राहतील, असं सांगून आपली व्यथा मांडली.