आज बरीचशी कुटुंब त्रिकोणी किंवा चौकोनी झाली आहेत. त्यामुळे लहान मुलांना घडवणे, त्यांना चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून देणे, शिस्त लावणे, त्यांच्यावर संस्कार करणे, हे पालकांपुढील मोठे आव्हान झाले आहे. त्यातच स्मार्टफोन नामक यंत्राने लहान मुलांच्या मनाचा ताबा घेतला आहे. अशावेळी, याच यंत्राचा वापर करून आपल्या मुलांसोबतच जगभरच्या मुला-मुलींना चांगलं काहीतरी शिकवण्याची 'स्मार्ट' कल्पना राजस्थानात कोटा इथं राहणाऱ्या रुची आणि पियुष या जोडीला सुचली आणि २०१७ मध्ये सुरू झाला 'आयू अँड पिहू शो'!
कुठलीही गोष्ट गोष्टीमधून समजावली, तर ती चांगली लक्षात राहते - मनावर ठसते, हे ओळखून रुचीने आपला ४ वर्षांचा लेक आयू आणि १० वर्षांची पिहू यांच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, खेळ, अॅक्टिव्हिटी तयार केल्या. त्या मुलांना आवडत आहेत, त्यात मुलं रमत आहेत, हे लक्षात आल्यावर पियुषनं आपल्या मोबाईलमध्ये छोटे छोटे व्हिडीओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. हे व्हिडीओ यू-ट्युबवर अपलोड झाले आणि 'वेलकम टू आयू अँड पिहू शो' म्हणणारी दोन गोंडस मुलं बघता-बघता घराघरात पोहोचली.
नेहमी खरे बोलावे, मोठ्यांचा आदर करावा, सगळ्या भाज्या खाव्यात इथपासून ते कोरोना काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी, मास्क कसा बनवावा इथपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी आयू आणि पिहूने आपल्या दीड कोटीहून अधिक मित्रांना सांगितल्या. शाळेतल्या गमतीजमती, सणांची महती, मित्रांसोबतची मस्ती, आई-बाबांसोबतची मुलांची घट्ट होणारी मैत्री असे पैलू या चॅनलवर पाहायला मिळतात. कधी कधी आयू-पिहू मजेशीर खेळ शिकवतात, तर कधी वेगवेगळी चॅलेंजेस (इमोजीवरून वस्तू ओळखणे, म्हणींचे अर्थ सांगणे) करतात. यातून मनोरंजनही होतं आणि ज्ञानात भरही पडते. आज या चॅनलचे व्हिडीओ व्ह्यूज ८ अब्जाहून जास्त आहेत. दर गुरुवारी अपलोड होणारा नवा व्हिडीओ, चांगला कंटेंट आणि साधी-सोपी मांडणी, हेच या चॅनलच्या यशाचे गमक आहे.