रेल्वे स्टेशन असो वा मेट्रो, रुळांपासून सुरक्षित अंतरावर उभं राहण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र रुळांपासून सुरक्षित अंतरावर कोणी मागून येऊन अचानक धक्का दिला तर..? आणि त्याचवेळी अगदी भरधाव रेल्वे त्याच व्यक्तीच्या दिशेनं आली तर..? सोशल मीडियावर या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.
बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रोजियर मेट्रो स्टेशनवर घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मेट्रो स्टेशनवर एका तरुणानं महिलेला अचानक मागून धक्का दिला. महिला रुळांवर जाऊन पडली. पुढच्या काही सेकंदांत भरधाव वेगानं मेट्रो आली. मेट्रो महिलेला धडक देणार असं वाटत होतं. मात्र मेट्रोच्या चालकानं प्रसंगावधान राखत ब्रेक दाबले. त्यामुळे मेट्रो महिलेपासून अवघ्या काही अंतरावर थांबली.
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महिलेच्या मागे असलेला तरुण प्लॅटफॉर्मवर अस्वस्थपणे फिरताना दिसत आहे. मेट्रो येताचा दिसताच त्यानं महिलेला धक्का दिला. त्यामुळे ती रुळांवर जाऊन पडली. मेट्रोच्या चालकानं परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपत्कालीन ब्रेक दाबले आणि मेट्रो रोखली. त्यामुळे महिलेचा जीव वाचला. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिला लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली.