शाळेतल्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांचं एक अतूट नातं असतं. त्यातले काही शिक्षक हे अत्यंत जवळचे आणि आवडीचे असतात. मुलं देखील त्यांचा प्रत्येक शब्द ऐकतात. त्यांच्या तासाला आठवणीने हजर राहतात. पण काही वेळा अशा शिक्षकांची बदली होते आणि विद्यार्थ्यांना याच फार वाईट वाटतं. अशीच एक हृदयस्पर्शी घटना आता समोर आली आहे. शिक्षक रमेश चंद्र आर्य (LT-इंग्रजी) हे चमोलीच्या जोशीमठ ब्लॉकमधील दुर्गम भागात असलेल्या शाळेत नोकरीला होते.
दुर्गम भागातील शाळेत जवळपास 18 वर्षांच्या सेवेनंतर शिक्षक रमेश चंद्र आर्य यांची बदली झाली आहे. त्यांच्या बदलीवर शाळेतील सर्व विद्यार्थी रडले. एवढेच नाही तर गावकऱ्यांनी देखील मोठ्या दिमाखात त्यांना निरोप दिला. शिक्षक रमेश चंद्र आर्य यांच्या इंग्रजी विषयाचा निकाल गेल्या 18 वर्षांपासून 100 टक्के लागला आहे.
इंग्रजीसारखा अवघड विषय त्यांनी विद्यार्थ्यांना अत्यंत मनोरंजक आणि अतिशय सोपा करून शिकवला. रमेश चंद्र आर्य यांच्यासारख्या शिक्षकांमुळे लोकांचा सरकारी शाळांवरील विश्वास वाढला आहे. आर्य यांच्या निरोप समारंभात सर्वजण भावूक झाले होते. लहान मुलं असोत, वडीलधारी मंडळी असोत सर्वजण रडले.
बदली झाल्यानंतर शिक्षक येथून जात असल्याचं त्यांना दुःख आहे. ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजींना फुलांचा वर्षाव, हार, ढोल-ताशांच्या गजरात अविस्मरणीय निरोप दिला. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.