Anand Mahindra On Jaspreet Viral Video : सोशल मीडियाच्या जगात कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना भुरळ पडली आहे. या लहान मुलाचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला अन् आनंद महिंद्रा यांच्यापर्यंतही पोहोचला. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या या १० वर्षीय मुलाच्या वडिलांचे निधन झाले आहे, त्याची बहीण १४ वर्षांची आहे आणि ती आपल्या काकांकडे राहते. संबंधित मुलगा आपला खर्च भागवण्यासाठी दिल्लीतील टिळक नगर भागाता रोल विकतो. मुलाने सांगितले की, तो त्याच्या वडिलांकडून रोल मेकिंग शिकला होता. काही जणांनी या मुलाचा व्हिडीओ बनवला, ज्याला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
महिंद्रांची मोठी घोषणाव्हिडीओ व्हायरल होताच आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओवर व्यक्त होताना त्याच्या कष्टाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, याचे नाव जसप्रीत असे आहे. तो दिल्लीतील टिळक नगर येथे राहतो असे मला कळले. जर कोणी या मुलाला ओळखत असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही त्याला त्याच्या शिक्षणासाठी कशी मदत करू शकतो याबद्दल महिंद्रा फाउंडेशनची टीम कार्य करेल.
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मदतीचा प्रस्ताव दिल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होत आहे. एकाने लिहिले की, ज्यांना खरोखर मदत हवी आहे अशा लोकांना मदत केलीच पाहिजे. दुसऱ्याने लिहिले की, आनंद महिंद्रा कष्टकऱ्यांसाठी जे कार्य करत आहेत ते नक्कीच कौतुकास्पद आहे. योग्य मदत मिळाल्यास या मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल, असेही एकाने लिहिले आहे.