नवी दिल्ली : एका ट्विटर युजरने पंजाबपोलिसांकडे एक तक्रार केली होती, ज्या तक्रारीला उत्तर दिल्यानं पंजाबपोलिसांचे विशेष कौतुक देखील केले जात आहे. झालं अस की ट्विटर युजरने एका अनोळखी महिलेला I LIKE YOU असा मेसेज पाठवला, ज्यामुळे महिलेच्या पतीने त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित व्यक्तीने पोलिसात धाव घेतली आणि मदत मागितली. त्याने केलेले ट्विट आता डिलीट करण्यात आलं आहे मात्र याचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
महिलेच्या पतीने केली बेदम मारहाण
पोलिसांना केलेल्या ट्विटमध्ये तक्रारदार ट्विटर युजर सुशांत दत्त म्हणाला, "सर मी अनोळखी महिलेला 'आय लाईक यू'चा मेसेज पाठवला, त्यानंतर मी माफी मागून देखील काल रात्री तिच्या पतीने मला बेदम मारहाण केली. मात्र आता मला माझ्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. कृपया माझी मदत करा आणि माझ्या मला सुरक्षा द्या, आज पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला होऊ शकतो."
पंजाब पोलिसांनी दिले उत्तर
ट्विटरच्या बायोनुसार भाष्य करायचे झाले तर सुशांत दत्त माहिती अधिकारचा (RTI) कार्यकर्ता आहे. पंजाब पोलिसांनी दिलेल्या उत्तरात म्हटले की, "तुम्ही एका अनोळखी महिलेला असा मेसेज पाठवल्यानंतर कोणती अपेक्षा करत होता याची कल्पना नाही. मात्र त्यांनी तुम्हाला मारहाण करायला नको होती. त्यांनी आम्हाला कळवायला हवं होतं आम्ही कायद्यानुसार योग्य ती सेवा केली असती. या दोन्ही गुन्ह्यांची कायद्यानुसार योग्य ती दखल घेतली जाईल."
दरम्यान, या संपूर्ण घटनेवरून आता पंजाब पोलिसांचे विशेष कौतुक केलं जात आहे. पोलिसांनी सुशांत दत्तला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्यास सांगितले. या संपूर्ण घटनेतील पंजाब पोलिसांच्या भूमिकेचे सर्वजण कौतुक करत आहेत. तसेच 'समस्येतून मार्ग काढणे' हेच पोलिसांचे काम असल्याचं सोशल मीडियावरील युजर्स बोलत आहेत.