सोशल मीडियावर फ्लाइटचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एअर होस्टेस मुलगी आणि तिची आई ही जोडी दिसत आहे. आई त्याच एअरलाईन्सची केबिन क्रू आहे. दोघेही एकाच फ्लाइटमध्ये एकत्र उपस्थित होत्या. याच दरम्यान, एअर होस्टेस मुलीने केबिन क्रू आईला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्यावर प्रवाशांनी टाळ्या वाजवून तिचं स्वागत केले. हे पाहून आई भावूक होऊन मुलीला मिठी मारते.
एअरलाइन कंपनी इंडिगोने हा व्हिडीओ शेअर केला होता. जो आतापर्यंत 70 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यावर शेकडो युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. आई-मुलीचे प्रेम पाहून ते भावूक झाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे - "मदर्स डेच्या शुभेच्छा, ज्यांनी मला नेहमी जमिनीपासून आकाशापर्यंत साथ दिली."
व्हिडिओच्या सुरुवातीला एअर होस्टेस तिचे नाव नबीरा समशी सांगत आहे. मग ती जवळ उभी असलेल्या तिच्या आईबद्दल सांगते. तिने आपल्या आईला सहा वर्षे केबिन क्रू म्हणून काम करताना कसे पाहिले हे सांगितले. आई तिच्यासाठी एक प्रेरणा होती. मात्र काल प्रथमच दोघेही एकाच फ्लाइटमध्ये एकत्र सेवा करत होत्या.
नबीरा तिच्या आईसमोर एक अनाऊसमेंट करते. नबीरा म्हणते- मला आशा आहे की तिला (आई) आज अभिमान वाटत असेल. अनाऊसमेंट संपल्यानंतर, नबीराची आई मुलीला मिठी मारते आणि किस करते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. त्याचवेळी फ्लाइटमध्ये बसलेले प्रवासी दोघींसाठी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देतात.
फ्लाइटमध्ये भावूक झालेल्या आई-मुलीचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून युजर्स त्यावर कमेंट करत आहेत. काहींनी आई-मुलगी जोडीला एकत्र काम करण्याची संधी दिल्याबद्दल इंडिगोचे आभार मानले, तर काहींनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. एका युजरने लिहिले - मदर्स डेला हार्ट टचिंग मोमेंट. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.