कोरोनाने कामाच्या पद्धतीत बदल केले आहे. ज्या कंपन्या हे बदल स्वीकारत नव्हत्या त्यांना आता ते स्वीकारावे लागत आहेत. कामासह अन्य अनेक गोष्टी आता ऑनलाईन होत आहेत. नोकरीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती करायची असेल तर ती सुद्धा आता ऑनलाईन केली जात आहे. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन मिटिंग सुरु असताना एक ना अनेक असे प्रकार घडले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे हसू झाले आहे. असाच काहीसा प्रकार या तरुणीसोबत झाल्याने तिला नोकरी गमवावी लागली आहे.
स्काईवेस्ट एअरलाइन्समध्ये (SkyWest Airlines) फ्लाईट अटेंडंट पदासाठी ही तरुणी इंटर्व्ह्यू देत होती. ऑनलाईन असल्याने ती घरातूनच ही मुलाखत देत होती. मुलाखत सुरु असताना असा काही प्रकार घडला की तिला सरळ नोकरी नाकारण्यात आली. शैलेन मार्टिनेज ही तरुणी ऑनलाईन इंटरव्ह्यू देत असताना तिला समजले नाही की तीने स्वत:ला रेकॉर्ड करण्यास सुरु केले आहे. याचवेळी समोरून एक प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिने त्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली. आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शैलेनला विचारण्यात आले, 'स्कायवेस्ट कंपनीच्या संस्कृतीबद्दल तुमचा काय दृष्टिकोन आहे आणि ते तुमच्याशी कसे जुळते?' या व्हिडीओमध्ये ती या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि फोनवर कोणाशी तरी बोलत असताना तिने सांगितले की, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मूर्ख प्रश्न आहे. दुर्दैवाने, तिला कल्पना नव्हती की चुकून तिने मुलाखतीसाठी या प्रश्नाचे उत्तर रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली होती.
अचानक, तिच्या लक्षात आले की तिची प्रतिक्रिया आधीच रेकॉर्ड केली जात आहे. हे पाहिल्यानंतर ती घाबरली. कॅमेऱ्यात बघितल्यानंतर मार्टिनेझ म्हणाला, 'अरे नाही, मला माफ करा, मला माहित नव्हते की हे रेकॉर्ड केले जात आहे, मी सराव करत होते,' त्यानंतर मुलाखतकाराने अचानक व्हिडिओ बंद केला. फुटेजच्या कॅप्शनमध्ये मार्टिनेझने लिहिले की, 'व्हिडिओ मुलाखतीदरम्यान तुम्हाला फक्त एक संधी मिळते, चुकून लवकर रेकॉर्डिंग सुरू केले.' डेली मेलच्या वृत्तानुसार, मार्टिनेझकडे प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी फक्त एक मिनिट होते आणि ती आणखी काही बोलण्याआधीच ती वेळ संपली होती.