Air India : गेल्या काही काळापासून देशातील काही विमान कंपन्यांबाबत प्रवासी सातत्याने तक्रारी करत आहेत. यात एअर इंडियाचे नाव आघाडीवर असते. ग्राहकांनी सोशल मीडियाद्वारे केलेल्या तक्रारींची बरीच चर्चा होते. आता एअर इंडियाच्या बंगळुरू-पुणे फ्लाईटबाबत एका प्रवाशाने तक्रार केली आहे. एका स्टार्टअप कंपनीचे उपाध्यक्ष असलेल्या आदित्य कोंडावार यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टद्वारे एअर इंडियाबाबत संताप व्यक्त केला.
त्यांनी म्हटले की, 'प्रिय एअर इंडिया, काल रात्री मला एक खास धडा शिकवल्याबद्दल धन्यवाद. मी हे पूर्ण गांभीर्याने बोलतोय, मी माझ्या आयुष्यात कधीही एअर इंडिया एक्स्प्रेस किंवा एअर इंडियाच्या विमानात बसणार नाही. गरज भासल्यास मी 100% अतिरिक्त पैसे देऊन दुसऱ्या कंपनीचे विमान घेईन किंवा बैलगाडीतून जाईन.'
त्यांनी पुढे लिहिले, 'माझी 9.50 ची फ्लाइट 12.15/12.20 ला टेक ऑफ झाली. फ्लाईटमध्ये अतिशय घाण वास येत होता आणि सीट्सदेखील अतिशय घाण डागांनी भरलेल्या होत्या. मला टाटा समूह आणि त्यांच्या प्रमुखांबद्दल खूप आदर आहे. मी त्यांच्याकडून नेहमीच परिपूर्णतेची अपेक्षा करतो.' या पोस्टनंतर एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांच्या पोस्टला रिप्लाय दिला आणि समस्येचे तात्काळ निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
कंपनीने म्हटले, 'आदित्य, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. कृपया लक्षात घ्या की, काही समस्या आमच्या नियंत्रणाबाहेर असतात, ज्यामुळे उशीर झाला. तुम्हाला विमानात झालेल्या समस्येकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्याचे त्वरित निराकरण करू.' दरम्यान, आदित्यच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करुन त्यांचा एअर इंडियाचा अनुभव शेअर केला.