Amit Shah in IPL 2022 Final: हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सला १३० धावांवर रोखले. कर्णधार हार्दिक पांड्याने दमदार गोलंदाजी करत संघाला विजयाची चांगली संधी मिळवून दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेला अंतिम सामना पाहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कुटुंबासह हजेरी लावली. राजस्थान रॉयल्सची फलंदाजी सुरू असताना अमित शहा आणि त्यांची पत्नी सोनल शाह हे सामन्याचा आनंद घेत असल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले.
गृहमंत्री अमित शहा यांना मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले, तेव्हा मैदानात उपस्थित असलेल्या चाहत्यांनी उत्साहाने जल्लोष केला. अमित शहा यांनीही चाहत्यांना व्हिक्टरी साईन दाखवलं. त्यानंतर स्टेडियममध्ये मोदी-मोदी अशा घोषणाही ऐकू आल्या. गृहमंत्री अमित शाह सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत, त्यांनी आदल्या दिवशीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती. अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत.
--
दरम्यान, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचे उद्घाटनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. येथे एका वेळी सुमारे १ लाख ३० हजार प्रेक्षक बसू शकतात. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच हंगाम असून ते आयपीएल फायनल खेळत आहेत. विशेष म्हणजे गुजरात पहिल्यांदाच आपल्या घरच्या मैदानावर सामना खेळत आहेत. गुजरात टायटन्सने आयपीएलच्या संपूर्ण हंगामात चांगली कामगिरी केली. साखळी सामन्याच्या समाप्तीनंतर ते संघ गुणतालिकेत अव्वल होते. त्यामुळे मूळचे गुजरातचे असलेले अमित शाह आपल्या पत्नीसह स्टेडियममध्ये हजर राहिले.