Viral News : दिल्लीहून कोलकाता येथे जाणाऱ्या विमानातून एक उद्योगपती व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव प्रवास करत होते. सुरक्षेमुळे वैष्णव यांना भेटणे शक्य नसल्याने उद्योगपतीने आपल्या मनात असलेला एक उद्योग प्रस्ताव टिश्यू पेपरवर लिहून रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचविला. त्यांचे विमान कोलकाता विमानतळावर उतरले व त्यानंतर अवघ्या सहा मिनिटांतच उद्योग प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलाविणारा फोन त्या उद्योगपतीला आला.
पेपर नॅपकिनवर लिहिलेल्या प्रस्तावाला अश्विनी वैष्णव यांच्याकडून उत्तर येईल अशी अपेक्षा उद्योगपतीने केली नव्हती. या उद्योगपतीचे नाव अक्षय सतनालीवाला आहे. त्यांनी टिश्यूपेपरवर अश्विनी वैष्णव यांना लिहिले होते की, मी ईस्टर्न ऑर्गेनिक फर्टिलायझर या कंपनीचे प्रतिनिधित्व करतो, पश्चिम बंगालमध्ये सर्वांत मोठ्या घनकचरा व्यवस्थापन कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. रेल्वे पुरवठा श्रृंखलेचा आमची कंपनी एक अविभाज्य अंग बनू शकते, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत योजनेतही मोठे योगदान देऊ शकतो. याबाबत तुमची भेट घेऊन चर्चा करण्याची इच्छा आहे.
साधारणत: २ फेब्रुवारीच्या दिवशी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव तसेच हे उद्योगपती दिल्ली ते कोलकत्ता दरम्यान विमानाने प्रवास करत होते. केंद्रीय मंत्र्यांना फ्लाइटमध्ये पाहिल्यानंतर, त्यांच्या मनात बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या व्यवसायाच्या कल्पनाबद्दल रेल्वे मंत्र्यांसोबत बोलण्यापासून ते स्वतःला रोखू शकले नाहीत. मात्र, फ्लाइटमधील प्रोटोकॉल आणि कडक सुरक्षा यामुळे ते रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. अखेर शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांनी आपल्या मनातील कल्पना टिश्यू पेपरवर लिहण्याची भन्नाट युक्ती त्यांना सुचली.