मुंबई: सध्या सोशल मीडियावर चेन्नईतील एका रिक्षा चालकाची चांगलीच चर्चा आहे. आता या चालकाचं कौतुक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील केलं आहे. महिंद्रा इलेक्ट्रिकच्या सीईओंनी या रिक्षा चालकाकडून काहीतरी शिकावं असा सल्ला महिंद्रा यांनी दिला. हा चालक मॅनेजमेंटचा प्रोफेसर आहे, अशा शब्दांत महिंद्रा यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
चेन्नईत रिक्षा चालवणाऱ्या अन्ना दुरई यांचा व्हिडीओ बेटर इंडियानं ट्विट केला. त्यातून दुरई यांच्या व्यवस्थापकीय कौशल्याची माहिती देण्यात आली होती. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला. 'एमबीएच्या विद्यार्थ्यांनी या चालकासोबत एक दिवस घालवल्यास तो त्यांच्यासाठी उत्तम अनुभव असेल. त्यातून त्यांना ग्राहक व्यवस्थापनाचा धडा मिळेल. ही व्यक्ती केवळ रिक्षा चालक नाही, तर व्यवस्थापन विषयाचा प्राध्यापक आहे,' अशा शब्दांत महिंद्रांनी दुरई यांची स्तुती केली.
आनंद महिंद्रा केवळ दुरई यांचं कौतुक करून थांबले नाहीत. त्यांनी महिंद्रा इलेक्ट्रिकचे सीईओ सुमन मिश्रा यांना ट्विटमध्ये टॅग केलं. 'यांच्याकडून जरा शिका,' अशी सूचना मिश्रा यांनी केली. त्यावर 'महिंद्रा इलेक्ट्रिकमध्ये आम्ही ही मानसिकता शिकण्यास, सहाय्य करण्यास उत्सुक आहोत,' असं मिश्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं.
अन्ना दुरई यांची रिक्षा इतकी प्रसिद्ध का?अन्ना दुरई चेन्नईत रिक्षा चालवतात. त्यांची रिक्षा सामान्य रिक्षांसारखी नाही. त्यांच्या रिक्षात वायफायची सुविधा आहे. टीव्हीचीही सोय आहे. एक लहानसा फ्रीजदेखील आहे. ग्राहकांसाठी लॅपटॉप आणि टॅबलेटची सुविधा आहे. रिक्षात मासिकं, वृत्तपत्र आहेत. विशेष म्हणजे यासाठी कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही.