महिंद्रा समुहाचे उद्योगपती आनंद महिंद्रा हे कोणाची स्तुती करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आज त्यांनी दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली आहे. त्यांना नितीन गडकरींचे एक काम एवढे आवडले की त्यांनी ट्विटरवर ते मांडले. या कामाला महिंद्रा यांनी सेंसिटिव्ह विकास, असे म्हटले.
राज्यातील मोठी शहरे, राजधानी उपराजधानीला जोडणारा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. Mumbai-Nagpur Highway वरून आनंद महिंद्रांनी एक ट्विट केले आहे. ''आम्हाला अशाप्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर विकासाची गरज आहे, जो आपल्या आधी या पृथ्वीवर आलेल्या प्राण्यांसाठी संवेदनशील असेल.''
आनंद महिंद्रांनी मुंबई-नागपूर हायवेवरील एका पुलावरून हे ट्विट केले आहे. या महामार्गावर खास प्राण्यांसाठी फ्लायओव्हर बनविण्यात आले आहेत. जंगलाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी यामुळे येथील प्राण्यांना त्रास होणार नाही. सोबतच बिबट्यासारखे वन्य प्राणी रस्त्यावर येऊ नयेत यासाठी या संपूर्ण महामार्गाला कुंपण घालण्यात येत आहे.
सुमारे 700 किमी लांबीचा हा महामार्ग देशातील पहिलाच महामार्ग असेल जिथे असा 'अॅनिमल फ्लायओव्हर' किंवा 'वाइल्ड लाईफ ओव्हरपास' बांधला जाईल. या संपूर्ण महामार्गाचा 117 किमीचा प्रवास जंगल, टायगर कॉरिडॉर आणि इको-सेन्सिटिव्ह झोनमधून जातो. यासाठी एकूण 9 वन्यजीव ओव्हरपास आणि 17 अंडरपास मार्गावर करण्यात आले आहेत. हा महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवासासाठी 16 ऐवजी 8 तास लागतील.
आता या ट्विटवर नेटकरी प्रश्न विचारणार नसतील ते कसले. 'प्राण्यांना ते वापरण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल का?' असा एका युजरने प्रश्न विचारला. यावर आनंद महिंद्रा यांनी चांगल्या शब्दांत सुनावत, 'त्यांना (प्राण्यांना) अक्कल शिकवण्याची गरजच पडणार नाही. आपण मानवांनीच हे शिकण्याची गरज आहे.''