आनंद महिंद्रांनी रशिया-युक्रेन युद्धप्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी ही ताकद अणुबॉम्बपेक्षाही मोठी असल्याचे म्हटले आहे. आनंद महिंद्रा यांनी न्यूयॉर्क टाइम्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये युक्रेनची राजधानी कीव (Kyiv) च्या रस्त्यांवर लागलेल्या रांगा दिसत आहेत. या रांगा सामान्य नागरिकांच्या आहेत. जे आपल्या भूमीला रशियाच्या आक्रमणापासून वाचविण्यासाठी शस्त्रे हातात घेण्यासाठी तयार आहेत.
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनच्या नागरिकांना युद्धात लढण्यासाठी लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. यानंतर या रांगा देशभक्तीचे प्रतिक दाखवत आहेत. याचा व्हिडीओ शेअर करून आनंद महिंद्रा म्हणतात की, जेव्हा लोकांकडे आपल्या देशाला वाचविण्याची इच्छाशक्ती असते, तेव्हा ही ताकद कोणत्याही अण्वस्त्रापेक्षा अधिक शक्तीशाली असते. अशा लोकांवर आक्रमण करणे शक्य होईल परंतू अधिपत्य गाजविणे असंभव असेल.
झेलेंस्की यांच्या आवाहनानंतर युक्रेनच्या रस्त्यांवर हजारो नागरीक गोळा झाले आहेत. रांगेत ते शस्त्रे ताब्यात घेत आहेत. त्यांना सैन्याचे जुजबी प्रशिक्षण दिले जात आहे. या व्हिडीओमध्ये लिब बोंडारेनको नावाच्या कॉम्प्युटर इंजिनिअर तरुणाने सांगितले की, रशियन हल्लेखोरांचा मुकाबला करता यावा म्हणून लोक आपली शस्त्रे घेण्यासाठी येथे थांबले आहेत. हे युद्ध लवकर संपण्याची चिन्हे नाहीत. मी एक सामान्य नागरिक आहे आणि कायद्याने मी अशा कोणत्याही कामात किंवा युद्धात भाग घेऊ शकत नाही. पण रशियन लोकांना माझा देश ताब्यात घ्यायचा आहे आणि मला जे आवडते ते सर्व नष्ट करायचे आहे. अशा परिस्थितीत मी माझ्या देशाचे रक्षण केले पाहिजे, कारण हे माझे घर आहे.