Anand Mahindra : 'एज इज जस्ट अ नंबर' ही म्हण एका निवृत्त अभियंत्याला अगदी तंतोतंत लागू पडते. त्यांचे इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन पाहून महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रादेखील (Anand Mahindra) प्रभावित झाले. सुधीर भावे (Sudhir Bhave), असे या वृद्धाचे नाव असून, त्यांनी स्वत:च्या कल्पनेनं अनोख्या सायकली तयार केल्या आहेत. या सायकली पाहून आनंद महिद्रांनी त्यांच्यासाठी एक हृदयस्पर्शी पोस्टही लिहिली आहे.
आनंद महिंद्रा यांनी या निवृत्त इंजिनीअरचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिला, "आज माझ्या इनबॉक्समध्ये एक चकीत करणारी स्टोरी आली. सुधीर भावे यांच्यासारखे लोक दाखवून देतात की, भारतातील कल्पकता आणि स्टार्टअपचा डीएनए केवळ तरुणांमध्येच नाही, तर प्रत्येक भारतीयामध्ये आहे. सुधीर, तुम्ही निवृत्त नाही आहात, तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात अॅक्टिव्ह आणि इनोव्हेटिव्ह टप्प्यात आहात. मी सुधीर यांच्या कल्पकतेला आणि उर्जेला नमन करतो." या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी सुधीर भावेंना त्यांच्या प्रयोगासाठी वडोदरा कारखाना वापरण्याची ऑफरदेखील दिली.
व्हिडिओमध्ये काय आहे?सुधीर भावे नावाच्या निवृत्त अभियंत्यांनी आपल्या कल्पनेच्या जोरावर अनोख्या सायकली तयार केल्या आहेत. व्हिडिओमध्ये त्यांनी सुमारे 5 ते 6 सायकली दाखवल्या, ज्या खरोखरच खूप आगळ्या-वेगळ्या आहेत. तुम्ही अशा सायकली यापूर्वी कधीच पाहिल्या नसतील. यापैकी एक सायकल चार्ज केल्यानंतर 50 किलोमीटर चालवता येते. बॅटरी संपल्यानंतर पेडल मारुन सायकल चार्ज करता येते. याशिवाय, इतर सायकल अशा आहेत, ज्यावर व्यायाम करता येतो. याशिवाय, सामानाची ने-आण करण्यासाठी फोल्डेबल सायकलदेखील त्यांनी तयार केली आहे.
नेटकऱ्यांची व्हिडिओला पसंतीआनंद महिंद्रा यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओला सुमारे चार लाख लोकांनी पाहिला असून, दहा हजार लोकांनी त्याला लाईक केला आहे. व्हिडिओ पाहून लोक कमेंटमध्ये सुधीर भावे यांच्या कल्पकतेचे कौतुक करत आहेत.